भारत-जपान दरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या

0

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या वार्षिक शिखर परिषदेनंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तसेच औषधनिर्मिती क्षेत्राशी संबंधित अनेक करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. आपल्या आत्मीयतेसाठी आणि मानवी नात्यांना जपणाऱ्या स्वभावासाठी जगभर प्रसिद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या समकक्ष पंतप्रधान सनाए ताकाइची यांचा उल्लेख आपल्या “लहान बहिणी” असा केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझी लहान बहीण पंतप्रधान सनाए ताकाइची, दोन्ही शिष्टमंडळांचे मान्यवर सदस्य, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, नमस्कार आणि ‘कोन्निचिवा’ (जपानी भाषेतील अभिवादन).” ते पुढे म्हणाले, “भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्या भारतातील पहिल्या दौऱ्याचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्याचबरोबर त्या दूरदृष्टी असलेल्या आणि व्यापक आदर मिळवलेल्या नेत्या आहेत. त्या नारा प्रांतातील असून, भारत आणि जपानच्या समान बौद्ध वारशाचे ते एक महत्त्वाचे केंद्र आहे.”

पंतप्रधान मोदी म्हणाले, “पंतप्रधान ताकाइची यांच्या या भेटीमुळे आपल्या ‘विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी’च्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. आज भारत आणि जपान हे दोन्ही देश जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी आहेत. मुक्त, समृद्ध आणि नियमाधारित ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र ही दोन्ही देशांची समान प्राथमिकता आहे. या प्रदेशातील सर्वात मोठ्या लोकशाही आणि बाजाराधारित अर्थव्यवस्था म्हणून आम्ही आज अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांवर सहमती दर्शवली आहे.”

यावेळी जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची म्हणाल्या, “जपानच्या मेरीटाईम सेल्फ-डिफेन्स फोर्सचे एक विनाशिका युद्धनौका (डिस्ट्रॉयर) आणि भारतीय नौदलाचे एक युद्धनौकेद्वारे संयुक्त सराव करण्याची योजना आहे. आम्ही हिंदी महासागरातील संयुक्त सराव वाढवणार आहोत. तसेच नौदलाच्या देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल क्षेत्रातील सहकार्याला चालना देणार असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत संरक्षण उपकरणांच्या निर्मितीतील सहकार्यही अधिक मजबूत करू. हे सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी संबंधित विभागांना वर्षअखेरीपूर्वी पुढील भारत-जपान द्विपक्षीय बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या, “पुढील वर्षी भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ‘भारत-जपान विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी’च्या माध्यमातून दोन्ही देशांतील जनतेला अधिक जवळ आणण्याची आमची इच्छा आहे, जेणेकरून विश्वासार्ह भागीदार म्हणून आपण समान सामरिक दिशा निश्चित करू शकू. माझे मोठे बंधू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने भारत-जपान संबंध नव्या उंचीवर पोहोचतील, असा मला विश्वास आहे. पुढील भेटीत जपानमध्ये पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यास मी उत्सुक आहे.” जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान ताकाइची यांचा हा दौरा भारत आणि जपानमधील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी ‘भारत-जपान ॲक्ट ईस्ट फोरम’ हा स्वतंत्र संस्थात्मक मंच स्थापन करण्यात आला असून, अशा प्रकारची यंत्रणा असलेला जपान हा भारताचा एकमेव भागीदार देश आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech