मुंबई : मुंबईतील भिवंडीमधील नारपोली परिसरात इमारतीचा एक भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. भंडारी कंपाऊंडमधील चार मजली कोहिनूर इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महापालिकेचे अधिकारी तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडिआरएफ ) आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना नारपोली येथील भंडारी कंपाऊंडमधील कोहिनूर इमारतीत घडली. महापालिकेने यापूर्वीच या इमारतीला ‘सी-श्रेणी’ (अतिधोकादायक व जीर्ण) म्हणून घोषित केले होते. त्यानंतर इमारत रिकामी करण्यात आली होती. मात्र, इमारत रिकामी असली तरी तिच्या तळमजल्यावर काही मजूर काम करत होते. प्राथमिक अंदाजानुसार, ढिगाऱ्याखाली सुमारे सहा ते सात मजूर अडकले असावेत.
दरम्यान, बचावकार्यात एनडीआरएफच्या पथकाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. ढिगाऱ्याखालून एका महिलेला जिवंत आणि सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून तिला तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव आणि शोधमोहीम अद्याप सुरू असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.