पुणे : राज्यातील उद्योगांची स्थिती अत्यंत बिकट असून, मागील काही वर्षांत सुमारे ३५ हजार ३०० उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक उद्योग राज्याबाहेर स्थलांतरित होत आहेत, असा दावा माजी मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील तसेच परिसरातील रस्त्यांची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील उद्योगांसमोर सध्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागील काही वर्षांत सुमारे ३५ हजार ३०० उद्योग बंद पडले असून, अनेक उद्योगांनी महाराष्ट्राबाहेर स्थलांतर केले आहे. त्याचा थेट परिणाम राज्यातील रोजगारनिर्मितीवर झाला आहे. चाकण औद्योगिक परिसरातील सुमारे २० उद्योजकही राज्यातून स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांकडे सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक परिसरातील रस्त्यांची पाहणी करताना त्यांनी स्थानिक पातळीवरील समस्यांची माहिती घेतली. रस्ते, वाहतूक आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात उद्योग टिकवून ठेवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, पायाभूत सुविधा सुधारणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.