जयपूरच्या बगरू गावामध्ये सरकारी शाळेवरून झाला वाद
जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमधील बगरू परिसरातील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळेच्या दुरवस्थेवरून मोठा वाद निर्माण झाला. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) ‘स्कूल ठीक करो’ अभियानाअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते शाळेची पाहणी करण्यासाठी गावात पोहोचले होते. मात्र, ग्रामस्थांनी त्यांचा विरोध करत त्यांना गावातून हुसकावून लावले. दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ता आशुतोष रांका यांने गावकऱ्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.
सीजेपीचे काही कार्यकर्ते बगरू गवामध्ये रामपुरा-कंवरपुरा येथील राजकीय प्राथमिक शाळेची परिस्थिती पाहण्यासाठी पोहोचले. ग्रामस्थांनी त्यांच्या उपस्थितीला विरोध केला आणि त्यांना तेथून जाण्यास सांगितले. काही वेळाने सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका स्वतः घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. हळूहळू परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि दोन्ही बाजुंनी धक्काबुक्की सुरू झाली. सीजेपीने आरोप केला की, कार्यकर्त्यांना मारहाण करून गावातून हुसकावून लावण्यात आले. यावेळी त्यांच्या वाहनांची तोडफोड करून काचा फोडण्यात आल्या. तसेच कार्यकर्त्यांवर वाळू उडवण्यात आली आणि दगडफेकही करण्यात आल्याचा आरोप आहे.
रांकांचा भाजप कार्यकर्त्यांवर आरोप
आशुतोष रांका यांनी या संपूर्ण घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला. मुलांनी खराब परिस्थितीत शिकत राहणे भाजपला मान्य आहे; मात्र शाळा सुधारण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना मान्य नाही, असा आरोप त्यांनी केला. “यापेक्षा लाजिरवाणी बाब आणखी काय असू शकते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र, भाजप कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
शाळेच्या दुरवस्थेबद्दल ग्रामस्थांमध्ये नाराजी
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील शाळेची इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. ग्रामस्थ विष्णू कुमार शर्मा यांनी सांगितले की, पूर्वी येथे पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा सुरू होती. शाळेसाठी त्यांचे आजोबा यांनी जमीन दिली होती आणि 1999 मध्ये शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर इमारतीची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नाही. शाळेची इमारत आता इतकी जीर्ण झाली आहे की, तेथे मुलांना बसवून शिकवणे धोकादायक आणि कठीण झाले आहे. सध्या ग्रामस्थांनी एका मोठ्या इमारतीत दोन खोल्या उपलब्ध करून दिल्या असून, तेथे दोन शिक्षक सुमारे 20 ते 30 मुलांना शिकवत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. हा परिसर बगरू विधानसभा मतदारसंघात येतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमदार डॉ. कैलाश वर्मा यांनी शाळेसाठी 9 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
सीजेपी राजकारण करीत असल्याचा आरोप
स्थानिक गावकरी असलेल्या राजेश कुमार शर्मा यांनी आरोप केला की, सीजेपी शाळेच्या समस्येचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे असे लोक गावात येऊ नये असे ग्रामीणांचे मत होते. भारतामध्ये विरोध करणे हा लोकशाही अधिकार आहे; मात्र आंदोलनाची पद्धत योग्य असली पाहिजे. सीजेपी राजकीय पोळी भाजून घेण्याचा आणि निधी उभारत असल्याचा आरोप राजेश यांनी केला. मात्र, त्यांनीही शाळेच्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारकडून शाळेसाठी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप शाळेचे बांधकाम सुरू झालेले नाही.
ग्रामस्थ स्वतः शाळा उभारणार
राजेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, सरकारने लवकरात लवकर शाळेचे बांधकाम केले नाही, तर ग्रामस्थ एकत्र येऊन स्वतः शाळा उभारतील. मुलांच्या भवितव्याचा विचार करून त्यांच्या पूर्वजांनी शाळेसाठी जमीन दिली होती, त्यामुळे सरकारने या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.त्यांनी सरकारकडे शाळेचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच गावातील मतदान केंद्र पूर्वी गावातच होते, मात्र यावेळी ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाकडेही सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.