तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मोहीम सुरू करण्याचा इशारा दिला आहे. इराणला आर्थिक संस्था, व्यवसाय, विमानतळ किंवा सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची ‘जीवनरेखा’ उपलब्ध करून देणाऱ्या देशांना गंभीर आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान इराणने ट्रम्प यांचा इशारा फेटाळून लावत अमेरिकेच्या आर्थिक दबावापुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी ‘एक्स’वर म्हटले की, ट्रम्प यांचा तथाकथित ‘इकॉनॉमिक डी-डे’ हा अमेरिकेतील स्वतःच्या आर्थिक संकटावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेवरील वाढते कर्ज आणि व्याजाचा वाढता खर्च यांचा उल्लेख करत अराघची यांनी म्हटले की, अपयशी धोरणे पुढे रेटल्यास अमेरिकेला आणखी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल. अमेरिकेने लादलेले आर्थिक निर्बंध जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही धोका असल्याचे त्यांनी म्हटले.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनेही अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांना इशारा दिला आहे. आयआरजीसीचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल हुसेन मोहेब्बी यांनी सांगितले की, या प्रदेशात पुन्हा लष्करी संघर्ष सुरू झाल्यास इराण पूर्वीपेक्षा अधिक विनाशकारी शस्त्रांचा वापर करेल.इराणच्या क्षेपणास्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वॉरहेडची क्षमता यापूर्वीच्या संघर्षांमध्ये वापरलेल्या शस्त्रांपेक्षा कितीतरी अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला. वृत्तानुसार, इराणने युरोपातील अमेरिकेच्या लष्करी तळांनाही संभाव्य लक्ष्य म्हणून निश्चित केले आहे. यामध्ये बल्गेरिया आणि सायप्रसमधील लष्करी तळांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेने इराणविरोधातील लष्करी कारवाईचा विस्तार केल्यास तेहरान मध्यपूर्वेच्या प्रदेशाबाहेर जाऊनही प्रत्युत्तर देऊ शकते, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिका आणि इराणमधील चर्चेचा अर्थ आत्मसमर्पण असा होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. इराण आपल्या प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असून चर्चेच्या माध्यमातून तो टप्प्याटप्प्याने पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.पेझेश्कियान यांच्या म्हणण्यानुसार, इराणचे उद्दिष्ट आर्थिक नाकेबंदी उठवणे, परदेशात अडकलेली आपली मालमत्ता मुक्त करून घेणे आणि अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर चर्चा करणे हे आहे.
वृत्तानुसार, इराण युद्धाचा वाढता खर्च लक्षात घेता पेंटागॉन आखाती प्रदेशातील अमेरिकी लष्करी उपस्थिती कमी करण्याचा विचार करत आहे.या प्रदेशात सुमारे ४० हजार अमेरिकी सैनिक आणि जॉर्डनपासून ओमानपर्यंत जवळपास २० लष्करी तळ आहेत. या तळांवर मोठ्या प्रमाणात लष्करी उपकरणे आणि कायमस्वरूपी पायाभूत सुविधा आहेत. इराणमधील युद्धामुळे सप्टेंबरपर्यंत अमेरिकेला सुमारे ३७.५ अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते, असाही अंदाज या वृत्तात व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी बुधवारी ‘ट्रुथ सोशल’वर म्हटले की, इराणकडून निर्माण झालेला धोका वेगळा पाडण्यासाठी आणि त्याचा पराभव करण्यासाठी अमेरिकेला आपल्या मित्रराष्ट्रांची गरज आहे. त्यांनी याला ‘इकॉनॉमिक डी-डे’ संबोधत इराणला वेगळे पाडण्यासाठी अभूतपूर्व पातळीवरील आर्थिक युद्ध आणि मोहीम सुरू करण्याचा इशारा दिला.
होर्मुझ सामुद्रधुनीच्या सामरिक महत्त्वालाही ट्रम्प यांनी कमी लेखले आहे. अमेरिकेतील ऊर्जा उत्पादन वाढल्याने आणि नव्या पुरवठा मार्गांचा विकास झाल्यामुळे या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील जगाचे अवलंबित्व पूर्वीसारखे राहिलेले नाही, असा त्यांचा दावा आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणला कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ३५० डॉलरपर्यंत पोहोचवायच्या होत्या. मात्र, अमेरिका आणि इतर देशांमधील तेल उत्पादन वाढल्यामुळे ते शक्य झाले नाही. सध्या कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे ८४ ते ८५ डॉलरच्या आसपास आहेत.