एफएसएसएआयने एव्हरेस्ट आणि एलजी ब्रँडच्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर मनाईचा आदेश जारी

0

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) दोन प्रमुख मसाला ब्रँड्स—मे. एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. लालजी गोधू अँड कंपनी (एलजी ब्रँड युनिट) द्वारे उत्पादित ‘मिश्रित हिंगा’च्या विक्रीवर मनाईचा आदेश जारी केला आहे. एका विशिष्ट ब्रँडच्या मिश्रित हिंगाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर, एफएसएसएआयने बाजारातील सर्व प्रमुख ब्रँड्सच्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी व्यापक बाजार देखरेख मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान करण्यात आलेल्या प्राथमिक प्रयोगशाळा चाचण्यांच्या अहवालानुसार, एव्हरेस्ट आणि एलजी या दोन्ही कंपन्यांची मिश्रित हिंगाची उत्पादने निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता करत नसल्याचे आढळून आले.

एफएसएसएआयने मुंबईतील मे. एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एलजी ब्रँड युनिट या केंद्रीय परवानाधारक कंपन्यांच्या कारखान्यांमधून थेट कायदेशीर नमुने गोळा केले. हे नमुने पुढील तपासणीसाठी प्राथमिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. याशिवाय, एफएसएसएआयने गुजरात राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) सहकार्याने गुजरातमधील उंबरगाव येथे असलेल्या मे. एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या राज्य परवानाधारक कारखान्याची संयुक्त पाहणी केली आणि तेथूनही नमुने गोळा केले. या सर्व कार्यवाहीदरम्यान गोळा करण्यात आलेल्या मिश्रित हिंगाच्या कायदेशीर नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या तपासणीतील सर्व नमुने निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता करत नसल्याचे आढळून आले.

एफएसएस (अन्नपदार्थ मानके आणि खाद्य पदार्थांमधील संयोजक) विनियम,२०११ अंतर्गत,मिश्रित हिंग हा कच्चा हिंग, डिंक, स्टार्च आणि विविध प्रकारच्या पिठांचे मिश्रण करून तयार केला जाणारा मान्यताप्राप्त प्रकार आहे. या विनियमांनुसार, अंतिम मिश्रित हिंग उत्पादनामध्ये किमान ५ टक्के अल्कोहोल मध्ये विरघळणारा अर्क (Alcohol Soluble Extract) असणे आवश्यक आहे. हे प्रमाण सुनिश्चित करण्यासाठी त्यामध्ये किमान निर्धारित प्रमाणात कच्चा हिंग वापरणे बंधनकारक आहे. मात्र, प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये निर्धारित निकषांनुसार आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा, हा अल्कोहोल मध्ये विरघळणारा अर्क अत्यंत कमी असल्याचे आढळून आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech