नाशिक व कोकण विभागात २९ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

0

• नाशिक-कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांत ४१८ हून अधिक ठिकाणी रोजगार मेळावे
• दीड हजारांहून अधिक कंपन्या व नियोक्त्यांचा सहभाग
• १ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांची नोंदणी, २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळावा’ या रोजगार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’ मेळावे निवडणुक आचारसंहिता लागू झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात नाशिक आणि कोकण विभागातील रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे उद्घाटन २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

नाशिक व कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये २९ सप्टेंबर रोजी ४१८ हून अधिक ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार असून, युवक-युवतींना त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.नाशिक व कोकण विभागात आतापर्यंत दीड हजारांहून अधिक कंपन्या व नियोक्त्यांनी रोजगार महाकुंभासाठी सहभाग नोंदवला आहे. तसेच १ लाखांपेक्षा अधिक इच्छुक युवक-युवतींनी नोंदणी केली असून, सहभागी कंपन्यांकडून २५ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी व रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्हानिहाय उद्योग, शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), महाविद्यालये, स्थानिक प्रशासन आणि अन्य संस्थांच्या समन्वयातून उमेदवार व नियोक्त्यांचे ‘कॅन्डिडेट–व्हॅकन्सी मॅचिंग’ करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विभागामार्फत ‘प्री-प्लेसमेंट ट्रेनिंग ड्राइव्ह’ राबविण्यात आली आहे. यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स, संवाद कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, मुलाखतीची तयारी आणि रोजगारक्षम कौशल्ये आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील बॅच २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

महिलांच्या रोजगार सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे उद्योग, कंपन्या, सेवा क्षेत्रातील आस्थापना आणि रिक्रूटमेंट एजन्सींचा सहभाग राहणार आहे. याच ठिकाणी नाशिक व कोकण विभागातील रोजगार महाकुंभाचा एकत्रित उद्घाटन समारंभ आयोजित करण्याचे नियोजन होती.

नाशिक व कोकण विभागातील १२ जिल्हे, ३०० हून अधिक रोजगार मेळावे, दीड हजारांहून अधिक नियोक्ते, १ लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत उमेदवार आणि २५ हजारांहून अधिक रोजगार संधी यांच्या माध्यमातून २९ सप्टेंबरचा ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ हा युवक-युवतींना उद्योग व रोजगाराच्या प्रत्यक्ष संधींशी जोडणारा व्यापक उपक्रम ठरणार आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक युवक-युवतीला त्याच्या कौशल्याला आणि पात्रतेला साजेशी रोजगाराची संधी मिळावी, हा ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’चा मुख्य उद्देश आहे. युवकांना केवळ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे नव्हे, तर मुलाखतीपूर्वी आवश्यक कौशल्ये व मार्गदर्शन मिळावे यासाठी प्री-प्लेसमेंट प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. महिलांच्या रोजगार सहभागाला चालना देण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठात फक्त महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. उद्योगांच्या गरजा आणि युवकांची कौशल्ये यांची सांगड घालून महाराष्ट्रातील अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech