नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा पहिला भारत दौरा? नोव्हेंबर अखेरीस होणार घोषणा

0

नवी दिल्ली : भारत-नेपाळ दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. लवकरच दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी बालेन शाह यांच्या पहिल्या द्विपक्षीय परदेश दौऱ्याचा अजेंडा निश्चित करण्यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री ४ नोव्हेंबर रोजी काठमांडू येथे पोहोचण्याची शक्यता आहे.कित्येक महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या राजनैतिक तणावानंतर हा दौरा होत आहे. यापूर्वी विक्रम मिस्री यांचा प्रस्तावित दौरा पुढे ढकलण्यात आला होता. तसेच लिपुलेखच्या मुद्द्यावरूनही दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.

नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान बालेन शाह यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्यादरम्यान नेपाळकडून पूरग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीसाठी, जलविद्युत क्षेत्रातील नव्या गुंतवणुकीसाठी आणि रखडलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी भारताकडे आर्थिक मदतीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. भारताकडून आर्थिक मदत मिळाल्यास नेपाळमधील रखडलेल्या प्रकल्पांच्या कामांना वेग येऊ शकतो. भारताकडून आर्थिक सहकार्य मिळावे, अशी काठमांडूची अपेक्षा आहे.

दरम्यान या दौऱ्याच्या माध्यमातून आर्थिक मदतीसंदर्भातील आश्वासनांना गती मिळावी, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत व्हावे आणि यापूर्वी झालेल्या करारांनंतरही अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पांमध्ये प्रगती व्हावी, यासाठी नेपाळ प्रयत्नशील आहे. भारताचे नवे राजदूत सुधाकर दलेला ३ नोव्हेंबर रोजी काठमांडू येथे पोहोचण्याची शक्यता आहे. विक्रम मिस्री यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या एक दिवस आधी ते नेपाळमध्ये दाखल होतील. पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याचा अजेंडा निश्चित करण्यासाठी परराष्ट्र सचिव नेपाळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech