हैदराबाद : राहुल गांधी हे एक नकली खासदार आहेत, ते कधीच एक असली खासदार आणि पंतप्रधान होऊ शकत नाही, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला. हैदराबाद येथे भाजपच्या ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रेदरम्यान शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस आणि मॉक पार्लमेंटरीवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी फक्त अशा नकली संसदेतच देशाचे पंतप्रधान बनू शकतात, खऱ्या संसदेत ते कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, त्यामुळे कमीत कमी मॉक पार्लमेंटरीमध्ये पंतप्रधान बनून सोनिया गांधी यांच्या मनाला शांती मिळू द्या, अशा शब्दात अमित शाहांनी टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाकडे देखील लक्ष वेधले. जर सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाला झुकवलं नसतं, तर आज हैदराबाद हा भारताचा भाग बनलाच नसता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाला गुडघे टेकवण्यास भाग पाडले. त्यामुळेच हैदराबाद संस्थान भारताचा भाग होऊ शकला. यासोबतच एसआयआर प्रकरणावरून देशव्यापी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा करत शाह यांनी केला.
आज हैदराबादच्या रस्त्यांवर शेकडो नागरिक उतरले आहेत. रविवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत देखील एक रॅली झाली होती. राहुल गांधी यांनी असा दावा केला होता की, ही काँग्रेसची ‘वोट बचाओ’ रॅली आहे. परंतु ती ‘वोट बचाओ’ रॅली नव्हती, तर घुसखोरांना वाचवा रॅली होती, असा हल्लाबोल देखील यावेळी अमित शाह यांनी केला. राहुल गांधी अशा पद्धतीने निवडणुका जिंकू शकत नाहीत. दर तीने ते चार महिन्यांनी ते परदेशात निघून जातात. जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी देशात राहावे लागते. हातात संविधानाची प्रत धरून चालत नाही, तर संविधानाचे पालन करावे लागते. काँग्रेस पक्षाकडून सातत्याने संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण केला जात आहे. आम्ही संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास तयार आहोत. राहुल गांधींनी संसदेत यावे आणि समोरासमोर चर्चा करावी. परंतु, ते चर्चा करणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे की, संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सर्व दाव्यांचा फज्जा उडवतील. त्यामुळेच केवळ अराजकता पसरवून बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दात अमित शाह यांनी टीका केली.