मुंबई : लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकांच्या माध्यमातून सरकार बदलण्याचा अधिकार जनतेला आहे; मात्र ‘Regime Change’च्या नावाखाली संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि त्यातून निर्माण झालेली लोकशाही व्यवस्था यांचे संरक्षण करण्यासाठी भाजपा आणि देशातील संविधानप्रेमी नागरिक कटिबद्ध आहेत. काँग्रेसच्या काळात आणीबाणी आणि घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून संविधानातील तरतुदींमध्ये बदल करण्यात आले होते. आज पुन्हा एकदा संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे ही लढाई भाजपची नाही, एनडीएची नाही; ही लढाई भारताच्या संविधानाची आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.
लोकशाहीचे रक्षण, भारतीय संविधानाची प्रतिष्ठा आणि देशहिताच्या विरोधात काम करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या वतीने सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘लोकतंत्र बचाओ – अराजकता हटाओ’ या अभियानांतर्गत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ‘लोकतंत्र बचाओ – अराजकता हटाओ’ या अभियानाच्या माध्यमातून लोकशाही मूल्ये, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रहितासाठी जनजागृती करण्याचा संकल्प भाजपा मुंबईच्या वतीने करण्यात आला.
दादर पश्चिम येथील सेनापती बापट पुतळा येथून सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप प्रभादेवी येथील कामगार कल्याण मंडळ मैदान येथे झाला. या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्यासह कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार, ॲड. मंगलप्रभात लोढा, श्री. नितेश राणे, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती श्री. सचिन अहिर, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आदी मान्यवर नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व मुंबईकर सहभागी झाले होते. मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित करत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले.