नवी दिल्ली : नेपाळमधील शे-फोक्सुंडो राष्ट्रीय उद्यान परिसरात झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे अडकलेल्या सहा भारतीय पर्यटकांची सोमवारी सुखरूप सुटका करण्यात आली. हिमवृष्टीमुळे हे पर्यटक १ नोव्हेंबरपासून संपर्काबाहेर होते. त्यांच्यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. डोल्पा जिल्हा पोलीस कार्यालयाचे प्रवक्ते बिनय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने या सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
सध्या त्यांच्यावर ड्यून येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हे पर्यटक काठमांडूपासून सुमारे ३०० किलोमीटर वायव्येला असलेल्या शे-फोक्सुंडो ग्रामीण नगरपालिकेतील धो या भागात गेले होते. संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर बर्फ साचल्याने ते तिथे अडकून पडले होते. रविवारी नेपाळी लष्कराचे हेलिकॉप्टर त्यांच्या बचावासाठी त्या भागात पोहोचले होते. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला उतरता आले नाही. त्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले होते. अखेर सोमवारी खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.