* प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याची पोलिसांची माहिती
* महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट घडवले जातील
मुंबई : राज्यातील तब्बल आठ सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. यामध्ये सातारा, मुंबई, सोलापूर, ठाणे, बीड, रत्नागिरी, परभणी आणि हिंगोली न्यायालयांचा समावेश असून त्यांच्या अकाऊंटवर ईमेलद्वारे धमकी आली आहे. याची माहिती मिळताच पोलीस, श्वान आणि बॉम्ब शोधक-नाशक पथकांना पाचारण करण्यात आले. न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना बाहेर काढून इमारती मोकळ्या करण्यात आल्या असून इमारतींमध्ये तपासणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पहिल्यांदा सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाला धमकीचा ईमेल आला. न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देऊ, असे ईमेलमध्ये म्हटले होते. त्यामुळे न्यायालयीन अधीक्षकांनी त्वरित सातारा शहर पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने न्यायालय परिसरात दाखल झाले. तसेच डॉग स्कोर आणि बीडीएस पथक देखील न्यायालयात पोहोचले. सर्व न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना बाहेर काढून न्यायालयाची इमारत मोकळी करण्यात आली.
साताऱ्यानंतर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, परभणी, सोलापूर, बीड आणि हिंगोली सत्र न्यायालयांना देखील अशाच पद्धतीने ईमेल द्वारे धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धमकी आलेल्या न्यायालयांच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा दाखल झाला असून कसून तपासणी करण्यात येत आहे. सायबर पोलीस या धमकीच्या ई-मेलचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर मुंबईतील कोर्टात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर दिंडोशी कोर्टाची पोलिसांकडून झडती घेण्यात आली. पोलिसांच्या तपासणीत सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.