‘पंचायत’ ठरला आयुष्याला कलाटणी देणारा अनुभव – अशोक पाठक

0

मुंबई  : वेब सीरिज ‘पंचायत’मध्ये बिनोद ही भूमिका साकारून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले अभिनेते अशोक पाठक आज घराघरांत ओळखले जाऊ लागले आहेत. या मालिकेने आपल्या करिअरला नवी ओळख दिली असून, हा अनुभव आयुष्य बदलणारा ठरल्याचे अशोक यांनी सांगितले. मालिकेतील ‘देख रहा है ना, बिनोद’ हा त्यांचा संवाद प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या एका संवादामुळे बिनोद हे पात्र प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे. आता ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता असून, हा सीझन ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘पंचायत’मधील यशानंतरही अशोक पाठक यांना केवळ बिनोद या एकाच भूमिकेपुरते मर्यादित राहायचे नाही. एखाद्या विशिष्ट व्यक्तिरेखेची छाप आपल्यावर कायम राहू नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच ते वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारण्यावर भर देत आहेत. ‘पंचायत’शिवाय ते ‘त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर’ यांसारख्या प्रोजेक्टमध्येही झळकले आहेत. प्रत्येक नवी भूमिका ही आपल्या अभिनयातील वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी असल्याचे त्यांचे मत आहे.

दरम्यान, अशोक पाठक लवकरच एचआरएक्स फिल्म्सच्या आगामी ‘स्टॉर्म’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात ते हरियाणवी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. ‘पंचायत’मधील बिनोदच्या भूमिकेपेक्षा ही भूमिका पूर्णपणे वेगळी असणार असून, या नव्या भूमिकेतून आपल्या अभिनयाची वेगळी बाजू दाखवण्यासाठी अशोक सज्ज झाले आहेत. त्यांच्या या नव्या भूमिकेकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech