नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पॅकेटबंद खाद्यपदार्थांमधील हानिकारक घटकांविषयी जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. ग्राहकांना त्यांच्या सेवनाच्या आरोग्यावरील परिणामांची जाणीव व्हावी, यासाठी पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर चेतावणी लेबल लावणे न्यायालयाने अनिवार्य केले आहे. न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (FSSAI) पॅकेजच्या पुढील भागावरील पोषणविषयक लेबलिंगचे (FoPNL) नियम अधिक कठोर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्राहकांना पॅकेट खरेदी करताना त्यातील घातक घटकांची तात्काळ आणि स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी न्यायालयाने ‘फ्रंट-ऑफ-पॅकेज न्यूट्रिशन लेबलिंग’ प्रणाली प्रभावीपणे लागू करण्यास सांगितले आहे. सर्व घटकांसाठी एकच एकत्रित चिन्ह न वापरता साखर, मीठ आणि फॅट यापैकी जो घटक जास्त असेल, त्या प्रत्येकासाठी षटकोनी स्वतंत्र लाल लेबल लावावे लागेल. प्रत्येक षटकोनी लेबलमध्ये संबंधित घटकाचे मानक चित्र असणे आवश्यक असून, त्यावर ठळक अक्षरांत “HIGH SUGAR”, “HIGH SALT” किंवा “HIGH FAT” असे लिहिलेले असावे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, पॅकेटच्या मुख्य दर्शनी भागाच्या ४ ते ५ टक्के इतका आकार प्रत्येक षटकोनी चिन्हाचा असावा आणि त्यातील अक्षरे सामान्य ग्राहकांना सहज वाचता येतील इतक्या मोठ्या फॉन्टमध्ये असावीत.
न्यायालयाने पोषण मानके ठरवताना तांत्रिक बाबींवरही कडक भूमिका घेतली आहे. साखरेचे प्रमाण ठरवण्यासाठी केवळ ‘ॲडेड शुगर’ ऐवजी ‘टोटल शुगर’ आणि फॅटचे प्रमाण ठरवण्यासाठी ‘सॅच्युरेटेड फॅट’ याला आधार मानण्याचे निर्देश FSSAI ला देण्यात आले आहेत. ही मर्यादा वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित असावी. मर्यादा इतकी कमी ठेवू नये की सर्वच उत्पादनांवर लाल लेबल लागून ग्राहकांना ‘लेबल थकवा’ येईल, आणि इतकी जास्तही ठेवू नये की हानिकारक उत्पादने कारवाईतून सुटतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.