मुंबई : या शतकातील २५ वर्षे सरली आहे. आता येणारी २५ वर्षे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. आता आपण थांबू शकत नाही, आपली दिशा ठरली आहे. आपली गती थांबू शकत नाही. आपल्याला ठरलेले ध्येय प्राप्त करायचे आहे, त्यासाठी आपल्याला आपले वर्क कल्चर बदलावे लागेल. आपले विचार बदलावे लागतील. आपल्या कामाची गती बदलली पाहिजे. जे काम गेल्या पाच-सात दशकांमध्ये झाले नाही, ते आपल्याला पुढील पाच-सात वर्षांत करायचे आहे. मला देशातील युवाशक्तीवर विश्वास आहे. आपल्या सर्वच क्षेत्रांत सुधारणांची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी शनिवारी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले.
मोदी पुढे म्हणाले की, सध्या ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे आपल्या चीप, एआय, डेटा सेंटर असो यासाठी आपल्या वीजेची मोठी गरज आहे. ऊर्जा सुरक्षा ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण महत्त्वाची पावले टाकली आहे. अणुउर्जा हा उर्जेचा मोठा स्रोत आहे. २०४७ पर्यंत १०० गिगावॅट उर्जानिर्मितीचे लक्ष्य आपण ठेवले आहे. पुढील दशकात पाच नवीन न्युक्लिअर रिअॅक्टर सुरु करण्याचे लक्ष्य आहे. यावर्षी भारताने फास्ट ब्रीडर न्युक्लिअर तंत्रज्ञानात महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे अणुउर्जेत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आपण महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. डिजिटल क्रांती आणि नवसंशोधनाच्या जोरावर भारताने जागतिक पटलावर आपला दबदबा निर्माण केला असून, आगामी काळात ‘मेड इन इंडिया ६जी’ आणि सेमीकंडक्टर निर्मितीच्या जोरावर भारत या क्षेत्राचे नेतृत्व करेल, असा नवा विश्वास त्यांनी व्यक्त केला.