भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा मंत्रालयात ध्वजारोहण समारंभ
मुंबई : विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मंत्रालय येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर ८.८ टक्के
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या बारा वर्षांत जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला असून २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात देशाला यश आले आहे. विकसित भारत म्हणजे केवळ विकसित अर्थव्यवस्था नव्हे, तर दीन-दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि महिलांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे होय, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असून यंदाच्या पहिल्या सहामाहीतील राज्याचा आर्थिक विकासदर जवळपास ८.८ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास १३ जिल्ह्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केले आहे. गडचिरोली, पालघर, नंदुरबार यांसह राज्यातील प्रत्येक भागात विकास पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.