सोलापूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनाचे काम २४ जूनपर्यंत तीन दिवसांच्या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी रात्री १० वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज आसैकर यांनी दिली. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या चरणांची होत असलेली झीज भरून काढण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष रासायनिक लेपन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आषाढी यात्रेपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रक्रियेसाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि सल्लागार परिषद सदस्यांच्या शिफारशींनुसार हे काम करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन वारकरी संप्रदायांनाही याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली आहे. या प्रक्रियेविरोधात काही संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार मूर्ती संवर्धनाचे काम सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.