बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

0

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव आसिम कुमार गुप्ता, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, कृती समितीचे प्रतिनिधी सचिन अहिरे, गजानन नांगे, नितीन नांदगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. कामगारांच्या हिताबरोबरच मुंबईकरांचे हितही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री सरनाईक म्हणाले की, येत्या अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये या प्रश्न संदर्भात बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तत्पूर्वी स्थानिक प्रश्नासंदर्भात महाव्यवस्थापक स्तरावर ज्या मागण्या पूर्ण करणे शक्य आहे, त्या या आठवड्याभरात पूर्ण कराव्यात असे निर्देश मी संबंधितांना दिले आहेत.

“बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. दररोज सुमारे ३० लाख प्रवासी बेस्ट सेवेवर अवलंबून आहेत. तसेच ४८ हजारांहून अधिक कामगार या संस्थेशी जोडलेले आहेत. त्यामुळे संपामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे मोठे हाल होऊ शकतात. चर्चा सकारात्मक वातावरणात सुरू असून, कर्मचाऱ्यांनी जनहिताचा विचार करून संप मागे घ्यावा,” असे भावनिक आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. सरकार आणि बेस्ट प्रशासन कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध असून, संवादाच्या माध्यमातून सर्व प्रश्न निकाली निघतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech