मुंबई : राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएस नाशिक प्रकरणात स्थापन केलेल्या तथ्यशोधन समितीचा सविस्तर अहवाल काल, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. आयोगाच्या शिफारशींनुसार कठोर आणि प्रभावी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अधिक माहिती अशी की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तथ्यशोधन समितीने १८ आणि १९ एप्रिल रोजी नाशिक दौरा केला. समितीने पीडित महिला, पोलीस अधिकारी तसेच इतर संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा केली. या ५० हून अधिक पानांच्या अहवालामध्ये २५ पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या आहेत. कार्यस्थळी महिलांची सुरक्षा, सन्मान, न्याय आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निष्कर्ष आणि उपाययोजना या अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत.
दरम्यान आज कोलकाता येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, याला ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ नंतरचा गंभीर प्रकार मानत, यामागे मोठा कट आहे का, याचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, काही कागदपत्रे एनआयएकडे सोपवण्यात आली आहेत. नाशिकमधील टीसीएसच्या बीपीओ युनिटमध्ये ६ पुरुष कर्मचारी आणि एका महिला एचआर मॅनेजरसह ७ जणांना महिला सहकाऱ्यांचा लैंगिक छळ आणि जबरदस्तीने धर्मांतराचा दबाव टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तपासात असे समोर आले आहे की, आरोपी एका संगठित टोळीप्रमाणे काम करत होते आणि पीडितांना बळी पाडत होते.