पाटणा : बिहारमध्ये नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने अनेक जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून, राज्यातील २२ लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने राबविण्यात येत आहे. बाधित नागरिकांना अन्न, निवारा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे. पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर, बेगूसराय, बक्सर, समस्तीपूर, मुंगेर, कटिहार, लखीसराय आणि अरवल या १२ जिल्ह्यांतील ७० प्रखंडांमधील ३६८ ग्रामपंचायतींना पुराचा फटका बसला आहे. या भागातील सुमारे २२.४२ लाख लोकसंख्या प्रभावित झाली आहे. पूरग्रस्त नागरिकांना अन्न उपलब्ध व्हावे यासाठी १९० सामुदायिक स्वयंपाकगृहे सुरू करण्यात आली असून, त्यामधून दररोज सुमारे २.५१ लाख नागरिकांना भोजन दिले जात आहे. ५ सप्टेंबर रोजी ८० असलेल्या सामुदायिक स्वयंपाकगृहांची संख्या रविवारी वाढवून १९० करण्यात आली.
याशिवाय तीन मदत छावण्यांमध्ये १,६३१ पूरग्रस्तांना निवारा, भोजन आणि इतर मूलभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. बाधित कुटुंबांना आतापर्यंत सुमारे ६५ हजार ७०० प्लास्टिक शीट्स आणि १२ हजार ७१२ कोरड्या शिध्याची पाकिटे वितरित करण्यात आली आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी १,४२९ बोटींचे संचालन सुरू आहे. तसेच प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिबिरांची संख्या ११८ वरून वाढवून १७१ करण्यात आली आहे. बचाव आणि मदतकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) १० पथकांसह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) २७ पथकांना विविध जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आले आहे.
केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार गंडक, कोसी, बूढी गंडक, गंगा, पुनपुन, बागमती आणि घाघरा या नद्या काही ठिकाणी धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहेत. वाल्मीकिनगर येथील गंडक आणि इंद्रपुरी येथील सोन बॅरेजमधील पाण्याचा विसर्ग सध्या स्थिर आहे. दरम्यान, बिहार हवामान सेवा केंद्राने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.