नवी दिल्ली : होर्मुज सामुद्रधुनीत भारतीय ध्वज असलेल्या ‘सनमार हेराल्ड’ या तेलवाहू जहाजावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भारत सरकारने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील इराणचे राजदूत डॉ. मोहम्मद फथाली यांना तातडीने पाचारण करून अधिकृत निषेध नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता इराणी राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. या घटनेत ओमानच्या उत्तरेकडे इराणी नौदलाने एका मोठ्या भारतीय कच्च्या तेलवाहू जहाजावर गोळीबार केला. संबंधित टँकरमध्ये इराकमधील सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल होते.
या घटनेपूर्वी होर्मुज सामुद्रधुनीतून २ भारतीय जहाजांना परत जाण्यास भाग पाडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ‘जग अर्णव’ आणि ‘सनमार हेराल्ड’ ही दोन्ही जहाजे या प्रकरणात सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी भारतीय नौदल प्रयत्न करत आहे. सध्या होर्मुज सामुद्रधुनीत भारतीय नौदलाचे कोणतेही जहाज नसले तरी ओमानच्या आखातात भारताचे २ डेस्ट्रॉयर, एक फ्रिगेट आणि एक टँकर तैनात आहेत.
दरम्यान, ब्रिटिश नौदलानेही शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, इराणी गनबोट्सने सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही जहाजांवर गोळीबार केला. तसेच काही व्यापारी जहाजांना इराणी नौदलाकडून रेडिओ संदेश मिळाले असून, सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याची आणि कोणत्याही जहाजाला प्रवेश दिला जाणार नसल्याची सूचना देण्यात आली आहे.जहाजांच्या ट्रॅकिंग डेटानुसार, शनिवारी सकाळी कतारमधील रास लफान येथून द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) घेऊन ५ जहाजे सामुद्रधुनीकडे जात होती.
गेल्या २८ फेब्रुवारीपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यानंतर आणि तेहरानने सामुद्रधुनी बंद केल्यानंतर फारसच्या आखातात शेकडो जहाजे अडकून पडली आहेत. यामुळे सौदी अरेबिया, यूएई, इराक आणि कुवैतसारख्या प्रमुख तेल-गॅस उत्पादक देशांना उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी करावे लागले आहे. या देशांनी सामान्य निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी सामुद्रधुनीतून जहाजांची सुरळीत वाहतूक होणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे.