(अनंत नलावडे)
मुंबई : राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला गुरुवारी अखेर यश आले.कारण राज्य सरकारने ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी आजच या पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट ‘अ’च्या २ हजार ७९५ आणि सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन गट ‘अ’च्या ३०८ पदांसाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला.
राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्वाना खुशखबर देत असताना राज्यात पशुधन विकास अधिकारी पदाच्या २ हजार ७९५ तर सहाय्यक आयुक्त पदाच्या ३०८ जागा भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुरू केली असून तशी जाहिरात प्रसिद्ध केल्याचे सांगत, ही परीक्षा आता ११ जून रोजी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे होणार असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रकही जारी केले असून संबंधित उमेदवारांची परीक्षा सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेते होणार असल्याचेही नमूद केले आहे.परीक्षेतील गुणांच्या आधारे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राज्यातील पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकारी रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवा, पशुधन आरोग्य तपासणी, लसीकरण आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात अडचणी येत होत्या.या निर्णयाबाबत आनंद व्यक्त करताना पशुसंवर्धन मंत्री मुंडे म्हणाल्या की, खूप दिवस झाले आपण ज्या अत्यंत आनंदाच्या बातमीची प्रतीक्षा करत आहात, ती बातमी तुम्हा सर्वांना देण्यासाठी मला आनंद होत असल्याचे नमूद केले. एवढे सर्व अधिकारी पशुसंवर्धन खात्यात रुजू झाल्यानंतर विभागाच्या कामाला मोठा वेग मिळेल. ग्रामीण भागातील लोकांच्या आणि त्यांच्या पशुधनाची अधिक चांगली काळजी घेणे शक्य होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी या भरतीमुळे राज्यातील पशुवैद्यकीय यंत्रणेला मोठे बळ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून या परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींना मुंडे यांनी परीक्षेसाठी शुभेच्छाही दिल्या.