पंतप्रधानांविरोधात अपशब्द वापरणाऱ्या अल्पवयीन मुलीविरोधात गुन्हा नाही; दिल्ली पोलिसांचा निर्णय

0

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येणार नसल्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणात कोणताही औपचारिक गुन्हा दाखल केला जाणार नाही, अशी माहिती दिल्ली पोलिस मुख्यालयातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

ही घटना जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या आंदोलनादरम्यान घडली होती. आंदोलनानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये संबंधित मुलगी पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरताना दिसली होती. त्यानंतर नोएडा पोलिसांनी या प्रकरणात झिरो एफआयआर दाखल केला होता. मात्र, सुरुवातीच्या नोंदीत संबंधित मुलीचे वय चुकीने २५ वर्षे नमूद करण्यात आले होते.

काही दिवसांनी संबंधित मुलीने स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करून आपण केवळ १५ वर्षांची असल्याचे स्पष्ट केले. तिने आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत संपूर्ण देशाची माफी मागितली. “मी जे बोलले ते अजिबात योग्य नव्हते. ती माझी पहिली आणि शेवटची चूक आहे. मला माझ्या कृत्याची लाज वाटते,” असे ती म्हणाली. आंदोलनस्थळी उपस्थित काही लोकांच्या प्रभावाखाली येऊन आपण असे वक्तव्य केल्याचा दावाही तिने केला.

त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तिच्या वयाची पडताळणी केली. ती अल्पवयीन असल्याचे निश्चित झाल्यानंतर तिच्याविरोधात पुढील कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोएडा पोलिसांनी दाखल केलेला झिरो एफआयआर संसद मार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र, संसद मार्ग पोलिसांनी या प्रकरणात नवीन गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असून मुलीविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाचा उल्लेख स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका इन्स्टाग्राम रिलमध्ये केला होता. त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या “भरकटलेल्या मुलांना” माफ करण्याची भूमिका जाहीर केली होती. अशा मुलांना शिक्षा करून किंवा न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावून कोणताही सकारात्मक बदल होणार नाही, असे ते म्हणाले. समाजानेही अशा तरुणांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करावा, सूडाची भावना बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या या भूमिकेनंतर आणि मुलीचे अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनीही कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असून हे प्रकरण आता कायदेशीरदृष्ट्या संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech