पुणे : पुणे विभागात अवयवदानाबाबत जनजागृती वाढत असून, मागील पाच वर्षांत ४०० मरणोत्तर अवयवदात्यांच्या माध्यमातून ८९६ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. २०२१ च्या तुलनेत २०२५ मध्ये अवयवदानाच्या प्रमाणात तब्बल ८० टक्क्यांची वाढ झाली असून, २०२६ च्या पहिल्या सात महिन्यांतच ४४ मरणोत्तर दात्यांची नोंद झाल्याने यंदाही हा आलेख वाढता राहण्याची चिन्हे आहेत. अवयवदान चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी झेडटीसीसी (ZTCC), रुग्णालयांतील समुपदेशक आणि विविध सामाजिक संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे दिसून येते. मात्र, प्रतीक्षा यादीतील रुग्णांना वेळेत अवयव उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करणे आणि ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांनी संमती देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोना काळात अवयवदानाच्या संख्येत घट झाली होती. मात्र, २०२२ नंतर ही चळवळ पुन्हा वेगाने वाढू लागली. २०२५ मध्ये विक्रमी ७९ मरणोत्तर दात्यांमुळे २०७ अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. तर २०२६ मध्ये अवघ्या सात महिन्यांत ४४ दात्यांकडून ११५ अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले असून, वर्षाअखेरीस हा आकडा आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पूर्वी अवयवदानाची चळवळ प्रामुख्याने मोठ्या खासगी रुग्णालयांपुरती मर्यादित होती. मात्र, आता ससून रुग्णालय आणि कमांड हॉस्पिटलसारख्या सरकारी संस्थांच्या सहभागामुळे ही चळवळ अधिक व्यापक होत असून, समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होत आहे.