आर्थिक वर्षात निर्यात ८६३ अब्ज डॉलरवर; ‘आत्मनिर्भर भारताचे’ खरे वैशिष्ट्ये – पीयूष गोयल

0

भारताची या आर्थिक वर्षात १ ट्रिलियन डॉलर आणि पाच वर्षांत २ ट्रिलियन डॉलरच्या निर्यातीचे उद्दिष्ट

नवी दिल्ली : भारताने या आर्थिक वर्षात १ ट्रिलियन डॉलर आणि पुढील पाच वर्षांत २ ट्रिलियन डॉलर मूल्याची निर्यात साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हेच ‘आत्मनिर्भर भारताचे’ खरे वैशिष्ट्य असेल असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत ‘भारतीय व्यापार महोत्सव’च्या संकेतस्थळाच्या अनावरण समारंभाला संबोधित करत होते. जागतिक आव्हाने असतानाही या आर्थिक वर्षात निर्यात ८६३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ५ टक्के जास्त आहे. वस्तू आणि सेवा दोन्ही क्षेत्रांतील निर्यातीत वाढ झाली असल्याचे सांगत सध्याच्या जागतिक वातावरणात ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.हे केवळ सरकारचे उद्दिष्ट नसून संपूर्ण देशाचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवण्यास तयार आहे, अशी ग्वाही गोयल यांनी दिली. गेल्या साडेतीन वर्षांत जवळपास ३८ विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करार करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत, ज्यामुळे अशा मोठ्या बाजारपेठांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश मिळेल जिथे प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत भारतीय वस्तू कमी आयात शुल्कात विकल्या जाऊ शकतील. हे करार टप्प्याटप्प्याने अंमलात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्व हितधारकांनी देशांतर्गत उत्पादनांच्या संधीचा आणि आयातीला पर्यायांचा शोध घेण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या व्यापार पोर्टलच्या माध्यमातून आयातीच्या कलांचा अभ्यास करावा, असे आवाहन पीयूष गोयल यांनी केले.देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची आणि स्वदेशीची भावना बळकट करण्याच्या गरजेवर पीयूष गोयल यांनी भर दिला. परदेशी वस्तूंना अगदी कमी प्रमाणात दिलेल्या प्राधान्यामुळे देखील देशांतर्गत उद्योग कमकुवत होऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला.केंद्रीय मंत्र्यांनी वैद्यकीय उपकरणांचे देशांतर्गत उत्पादन वाढत असल्याकडे लक्ष वेधले आणि त्यासाठी विशाखापट्टणम येथे उत्पादित झालेल्या सिटी स्कॅन मशीनचा दाखला दिला. भारतीय बनावटीच्या उत्पादनांचा जास्तीत जास्त स्वीकार केल्यास त्यांची मागणी वाढेल आणि उत्पादन कार्याचा विस्तार होईल, असे त्यांनी सांगितले.

गुणवत्ता आणि उत्पादकतेचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले की, उत्तम गुणवत्ता आणि पॅकेजिंगशिवाय भारत जागतिक बाजारपेठांवर पकड मिळवू शकणार नाही. जागतिक आव्हाने असूनही भारत वेगाने प्रगती करत आहे आणि भारताची निर्यातही सातत्याने वाढत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कृषी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील क्षमता अधोरेखित करताना गोयल म्हणाले की, शेतकरी आणि मच्छिमारांच्या उत्पादनांसह भारताची कृषी निर्यात जवळपास 5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. मात्र, या क्षेत्रांमधील मूल्यवर्धन अद्यापही कमी असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमात तरुण उद्योजक, स्टार्टअप्स आणि देशभरातील तरुणांसह पुढील पिढीला सामील करून घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ‘भारतीय व्यापार महोत्सव’ १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू होईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech