प्रसिद्ध जीनोम शास्त्रज्ञ जे. क्रेग वेंटर यांचे निधन

0

सॅन डिएगो : प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ आणि मानवी जीनोम डिकोड करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जे. क्रेग वेंटर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. ‘जे. क्रेग वेंटर इन्स्टिट्यूट’ (जेसीव्हीआय) ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बुधवारी, २९ एप्रिल २०२६ रोजी सॅन डिएगो येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतेच त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते आणि त्यावरील उपचारादरम्यान उद्भवलेल्या अनपेक्षित दुष्परिणामांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

क्रेग वेंटर हे प्रामुख्याने त्यांच्या ‘ह्युमन जीनोम प्रोजेक्ट’मधील क्रांतीकारी योगदानासाठी जगभर ओळखले जातात. २००० साली त्यांनी ‘सेलेरा जीनोमिक्स’ या त्यांच्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून मानवी डीएनएचे ३.१ अब्ज रासायनिक घटक डिकोड करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करून दाखवली होती. त्यांच्या या संशोधनामुळे कर्करोग आणि हृदयविकारांसारख्या अनेक गंभीर आजारांमागील अनुवांशिक (जेनेटीक) कारणे शोधणे आणि भविष्यातील उपचारांच्या पद्धती विकसित करणे वैद्यकीय विज्ञानाला शक्य झाले. स्वतःच्या जीनोमची संपूर्ण माहिती सार्वजनिक करणारे ते जगातील पहिले व्यक्ती होते.

‘सिंथेटिक बायोलॉजी’ क्षेत्रात पायाभूत कार्य
मानवी जीनोमच्या पलीकडे जाऊन वेंटर यांनी ‘सिंथेटिक बायोलॉजी’च्या क्षेत्रातही पायाभूत कार्य केले. प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या डीएनए तयार करून जगातील पहिली ‘कृत्रिम पेशी’ निर्माण करण्याची ऐतिहासिक आणि आश्चर्यकारक कामगिरी त्यांनी २०१० मध्ये त्यांच्या टीमसह केली होती. जीवशास्त्राला तंत्रज्ञानाची जोड देऊन विज्ञानाला एका नव्या युगात नेण्याचे त्यांचे हे कार्य वैद्यकीय आणि विज्ञान क्षेत्रात कायम दिशादर्शक ठरेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech