नवी दिल्ली : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या त्यांच्या सरकारची सत्ता गेल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी भारतात प्रथमच खुल्या स्वरूपात माध्यमांसमोर येणार आहेत. त्या ५ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका आभासी (व्हर्च्युअल) कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यामध्ये त्या आपल्या भविष्यातील राजकीय योजनांबाबत तसेच बांग्लादेशात परतण्याच्या शक्यतांबाबत भाष्य करणार आहेत. हा कार्यक्रम फॉरेन करस्पाँडंट्स क्लब ऑफ साऊथ एशिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत नवी दिल्लीतील मथुरा रोडवरील सर मार्क टली सभागृहात होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण क्लबच्या सामाजिक माध्यमांवरील विविध मंचांवरही करण्यात येणार आहे.
शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या सत्ताकाळाच्या पतनाला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी आरक्षण व्यवस्थेविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने पुढे देशव्यापी सरकारविरोधी आंदोलनाचे रूप धारण केले होते. आंदोलकांनी सरकारी इमारतींवर ताबा मिळवणे आणि हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर शेख हसीना यांना बांग्लादेश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या जवळपास १६ वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट झाला.भारतामध्ये आल्यानंतर शेख हसीना यांनी सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर राहणे पसंत केले होते. त्यामुळे सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरचे हे त्यांचे पहिले मोठे सार्वजनिक संबोधन मानले जात आहे.
या कार्यक्रमात शेख हसीना यांच्यासोबत बांग्लादेशातील अनेक प्रमुख राजकीय नेते, माजी मंत्री, मुत्सद्दी आणि विश्लेषक सहभागी होणार आहेत. यामध्ये त्यांचे पुत्र आणि बांग्लादेशचे माजी माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) सल्लागार सजीब वाजेद जॉय, माजी शिक्षणमंत्री मोहिबुल हसन चौधरी नोफेल, बांग्लादेश ह्युमन राइट्स वॉचचे महासचिव मोहम्मद अली सिद्दीकी, माजी क्रिकेटपटू आणि माजी खासदार शाकिब अल हसन, माजी मुत्सद्दी व सुरक्षा तज्ज्ञ अमीनुल हक पोलाश, राजकीय व दहशतवादविरोधी विषयांचे विश्लेषक अबू ओबैधा आरिन आणि बांग्लादेश ह्युमन राइट्स वॉच यूएसएचे संचालक शाह एमडी बख्तियार यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. वाइल अव्वाद भूषवणार आहेत.
दरम्याम, शेख हसीना यांच्या सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर बांग्लादेशच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२६ मधील सार्वत्रिक निवडणुकांनंतर संपुष्टात आला. त्यानंतर बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आणि तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. नव्या सरकारने अवामी लीगच्या अनेक नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू ठेवली आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अवामी लीगच्या राजकीय उपक्रमांवर देशाच्या दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत घालण्यात आलेली बंदी अद्याप कायम आहे.