राज्यस्तरीय संघटन आढावा बैठकीला नाशिकमधून सुरुवात
नाशिक : शिवसेनेच्या संघटन बळकटीकरणासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानपरिषद निवडणुकांच्या तयारीसाठी राज्यभर आढावा बैठकींची मालिका सुरू करण्यात आली आहे. त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून करण्यात आली आहे. नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षाची ताकद, बीएलओ नेमणुका, स्थानिक प्रश्न आणि निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
नाशिकमध्ये आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांचा टप्प्याटप्प्याने आढावा घेतला जात आहे. कोणत्या गटात शिवसेनेची ताकद किती आहे, याची माहिती घेण्यात येत आहेत. एसआयआर माध्यमातून बीएलओ नेमणुका झाल्या आहेत का, याचाही अभ्यास केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे १.२५ लाख बीएलओ नेमणुका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, विधानपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जात आहे. “प्रत्येक गट आणि गणातील समस्या जाणून घेत आहोत. कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी समजून घेतल्याशिवाय संघटना मजबूत होत नाही,” असेही ते म्हणाले.
नाशिक महापालिकेतील पराभवाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, काही जागा अत्यंत कमी फरकाने गमावल्या गेल्या. मात्र शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास कायम असल्याचा दावा त्यांनी केला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत विचारले असता, “सर्व कामे वरिष्ठ पातळीवर समन्वयातून केली जात आहेत. येणाऱ्या काळात सर्व विभागांच्या समन्वयातून कामे पूर्ण होतील,” “जिथे आवश्यक आहे तिथेच खर्च केला जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला असून ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या गैरहजेरीबाबत विचारले असता, “त्यांचे वैयक्तिक काम असल्याने ते उपस्थित नव्हते. ते आमचे निष्ठावान पदाधिकारी आहेत.माझा त्यांच्याशी संपर्क झाला असल्याचे खा. शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री दादा भूसे, आ.सुहास कांदे, माजी आ. नरेंद्र दराडे, अजय बोरस्ते, उपमहापौर विलास शिंदे, बंटी रितदमे आदी उपस्थित होते.
विधानपरिषद निवडणुकांबाबत संकेत
विधानपरिषद निवडणुकांबाबत बोलताना खा. शिंदे यांनी सांगितले की, शिवसेनेने यापूर्वी लढवलेल्या जागांवर पुन्हा निवडणूक लढवली जाईल. त्यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू असून, मात्र अंतिम निर्णय पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील.