इस्त्रोला २०२५ मध्ये मिळाले १.५ लाखांहून अधिक अलर्ट
बंगळुरू : अंतराळात वाढत असलेला अवकाश कचरा आणि उपग्रहांची वाढती संख्या ही आता जागतिक अंतराळ संस्थांसाठी मोठी चिंता बनली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) इंडियन स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस रिपोर्ट-२०२५ मध्ये या धोक्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अवकाशात कचरा आणि उपग्रह सुमारे २८ हजार किलोमीटर प्रतितास वेगाने फिरतात. त्यामुळे अगदी लहान कणाची टक्करही मोठे नुकसान करू शकते. या अलर्ट्सच्या आधारे इस्त्रोने १४ मॅन्यूव्हर LEO उपग्रहांसाठी ४ मॅन्यूव्हर GEO उपग्रहांसाठी एकूण १८ वेळा कक्षा बदल केले. यामध्ये १.२ अब्ज डॉलर्स मूल्याचा निस्सार उपग्रह देखील समाविष्ट होता, ज्याला संभाव्य टक्कर टाळण्यासाठी सुरक्षित कक्षेत हलवण्यात आले. या अहवालानुसार, २०२५ मध्ये इस्त्रोला सुमारे १.५ लाखांहून अधिक क्लोज एप्रोच अलर्ट्स प्राप्त झाले. या अलर्ट्समुळे संभाव्य टक्कर टाळण्यासाठी भारतीय उपग्रहांना १८ वेळा कोलिजन अवॉइडन्स मॅन्यूव्हर (सीएएम) करावे लागले.
वर्तमानात इस्त्रो पृथ्वीभोवती ५३ कार्यरत उपग्रह चालवत आहे. यामध्ये २२ उपग्रह लो अर्थ ऑर्बिट मध्ये पृथ्वीपासून ५००–१००० किमी उंचीवर) ३१ उपग्रह जियोसिंक्रोनस अर्थ ऑर्बिटमध्ये (सुमारे ३६,००० किमी उंचीवर) आहेत. लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रह पृथ्वी निरीक्षण आणि वैज्ञानिक प्रयोगांसाठी वापरले जातात, तर जियोसिंक्रोनस उपग्रह हवामान, दूरसंचार आणि नेव्हिगेशन सेवांसाठी महत्त्वाचे ठरतात. अहवालानुसार, लो अर्थ ऑर्बिटमध्ये उपग्रहांची संख्या वेगाने वाढत असून अवकाश कचऱ्याचा धोका गंभीर बनला आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये यूएस स्पेस कमांडच्या कॉम्बाइंड स्पेस ऑपरेशन्स सेंटर ने सुमारे १.५ लाख क्लोज एप्रोच अलर्ट्स जारी केले.
कोलिजन अवॉइडन्स मॅन्यूव्हरमध्ये उपग्रहांचे थ्रस्टर्स वापरून कक्षा बदलली जाते. मात्र, यासाठी इंधन खर्च होते. उपग्रहातील इंधन मर्यादित असल्यामुळे अशा हालचालींमुळे त्यांचा कार्यकाळ कमी होऊ शकतो गेल्यावर्षी २०२५ मध्ये इस्त्रोच्या सर्व ५ प्रक्षेपणांपूर्वी टक्कर धोका तपासावा लागला. एका प्रकरणात एलव्हीएम३-एम६ मिशनचे प्रक्षेपण ४१ सेकंदांनी पुढे ढकलण्यात आले. तसेच चांद्रयान-२ ऑर्बिटरसाठी १६ वेळा ऑर्बिट बदल करण्यात आले, तर एकूण ८४ वेळा मिशन नियोजनात बदल करावा लागला.
अहवालानुसार, अंतराळात १० सेमीपेक्षा मोठे सुमारे ४० हजार कचऱ्याचे तुकडे १ सेमीपेक्षा मोठे सुमारे १२ लाख तुकडे असून सध्या हजारो नवीन उपग्रह प्रक्षेपित होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.अंतराळ आता केवळ संशोधनाचे क्षेत्र न राहता अत्यंत गर्दीचे आणि जोखमीचे वातावरण बनत आहे. भविष्यात उपग्रह व्यवस्थापन आणि अवकाश कचरा नियंत्रण हे जागतिक अंतराळ मोहिमांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.