ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात UPSC व MPSC परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रख्यात माईंड रीडर भूपेश दवे यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, प्रशस्तीपत्रे व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच देश आणि राज्याच्या सेवेसाठी UPSC व MPSC परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये अंकिता पाटील (UPSC – IPS कॅडर) , पारस मेस्त्री (UPSC – IRS), डॉ. मनिष झेंडे (UPSC), ऋषिकेश घोडविंदे (UPSC), ऐश्वर्या सुर्वे (MPSC) आणि संकेत अहिरे (MPSC) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना पूर्वेश सरनाईक म्हणाले की, “सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना करिअरविषयक योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी आम्ही गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करतो. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. ओवळा-माजिवडा मतदारसंघातील सुमारे एक हजारांहून अधिक विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमास ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.