जयंत पाटलांचा विधानसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल, तातडीच्या चर्चेची मागणी
(अनंत नलावडे)
मुंबई : राज्यातील मुसळधार पावसाने निर्माण केलेल्या भीषण परिस्थितीवरून मंगळवारी विधानसभेत विरोधकांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत,सभागृहाचे नियोजित कामकाज बाजूला ठेवून राज्यातील पावसामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीवर तातडीने चर्चा घेण्याची जोरदार मागणी केली.”जनता संकटात असताना सरकारने केवळ आश्वासनांवर न थांबता तातडीने उत्तर द्यावे,” असा थेट इशाराच त्यांनी दिला.
मुंबई,नाशिक,पालघर,चिपळूणसह संपूर्ण कोकण आणि राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे.पूरस्थिती, भूस्खलन, झाडे कोसळणे, वाहतूक व्यवस्था ठप्प होणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक ठिकाणी दुर्दैवी जीवितहानी झाल्याची गंभीर बाबही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांच्या गुणवत्तेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.नुकतीच पूर्ण झालेली अनेक विकासकामे पहिल्याच जोरदार पावसात उखडून निघत असल्याने कोट्यवधी रुपयांच्या खर्चावर प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.”हा केवळ नैसर्गिक आपत्तीचा विषय नाही, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि निकृष्ट कामांचा परिणाम आहे,” असा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी सरकारवर केला.
“राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून नुकसान आणि मदतीसाठी हाक येत आहे.अशा वेळी नियमित कामकाज सुरू ठेवणे म्हणजे जनतेच्या वेदनांकडे पाठ फिरवण्यासारखे आहे.प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघातील परिस्थिती सभागृहात मांडण्याची संधी मिळाली पाहिजे,” असे सांगत त्यांनी कामकाज स्थगित करून पावसाच्या संकटावर विशेष चर्चा घेण्याचाही यावेळी आग्रह धरला.
राज्यातील जनतेच्या सुरक्षेपेक्षा आणि संकटग्रस्तांच्या मदतीपेक्षा कोणताही विषय महत्त्वाचा नसल्याचे स्पष्ट करत पाटील यांनी सरकारने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत, पंचनामे, पुनर्वसन आणि आपत्कालीन उपाययोजनांबाबत ठोस निर्णय जाहीर करावेत, अशीही मागणी केली. त्यामुळे पावसाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत विरोधकांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकार नेमकी काय भूमिका आणि पुढील निर्णय घेते यावरच या चर्चेचे सर्व फलित अवलंबून आहे.