मुंबईतील ६ नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटवर एफडीएची कारवाई; परवानेही रद्द

0

मुंबई : राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि क्लबवर कारवाई करण्यात आली असून संबंधित आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

एफडीएच्या पथकाने २७ जून रोजी आदित्य बिर्ला न्यू एज रेस्टॉरंट्स अँड कॅफे प्रायव्हेट लिमिटेडतर्फे चालविण्यात येत असलेला नरिमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगसह अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित रेस्टॉरंटचा अन्न सुरक्षा परवाना निलंबित करण्यात आला. तसेच बोरीवली येथील एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे आढळून आल्याने तेथेही कठोर कारवाई करण्यात आली.

भांडुप येथील हॉटेल श्रीकृष्णा (सुजित बार अँड रेस्टॉरंट) येथे तपासणीदरम्यान रेफ्रिजरेटरची स्थिती निकृष्ट असल्याचे, तापमान नियंत्रणाची नोंद ठेवली जात नसल्याचे तसेच स्वच्छतेच्या अनेक त्रुटी आढळून आल्या. याशिवाय हॉटेल गोपाल कृष्ण (सांताक्रूझ), कारक एंटरप्रायझेस (अंधेरी) आणि मद्रास डायरीज (वांद्रे) परिसरातील आस्थापनांवरही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास त्वरित एफडीएकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले असून यासाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

“ग्राहकांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आणि तडजोड न करण्यासारखी बाब आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरीज आणि सर्व खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अचानक तपासणी आणि नियमांची कठोर अंमलबजावणी यापुढेही सुरू राहील,” असे मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, एफडीएच्या धडक कारवाईचा गैरफायदा घेत काही भामटे बनावट अधिकारी बनून हॉटेल व्यावसायिकांना धमकावत असल्याची घटना समोर आली आहे. बोरीवली पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये स्वतःला एफडीए अधिकारी असल्याचे सांगत दोन जणांनी धाड टाकली आणि अन्न नमुने तपासणीच्या नावाखाली कारवाईची धमकी दिली. त्यांनी ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे बनावट ओळखपत्र दाखवल्याचा आरोप हॉटेल मालकाने केला. संशय आल्याने हॉटेल मालकाने पोलिसांकडे तक्रार केली असून संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचबरोबर तुकाराम मुंढे यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना ग्राहकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांनी मागणी केल्याशिवाय बाटलीबंद पाणी देऊ नये तसेच मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असल्याचा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला असून राज्यभर अशा धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech