मुंबई : शिवसेना कोणाची, या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटातील फुटीर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना अशा प्रकारची भेट घेऊन न्यायालयावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. देशातील लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आता जनतेची असल्याचे आवाहनही त्यांनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यापूर्वी अमित शहा यांची भेट घेत होते आणि आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटत आहेत. अमित शहा मुंबईत असताना पंतप्रधान मोदी आणि फुटीर खासदारांची भेट का झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे’, हा धमकीवजा संदेश मोदींनी नेमका कुणाला दिला? अमित शहा यांना, न्यायालयाला की देवेंद्र फडणवीस यांना, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या भेटीचे वृत्त आणि वातावरणनिर्मिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ही लढाई केवळ शिवसेनेपुरती मर्यादित नसून देशभर गद्दारीचा ‘व्हायरस’ पसरत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. इतर पक्षांमधील फुटीर नेत्यांनाही सत्ताधाऱ्यांकडून अशाच प्रकारचा संदेश दिला जात आहे का, असा सवाल त्यांनी केला. ‘आमच्याकडे या, तुमच्या केसालाही हात लागणार नाही’, असा संदेश दिला जात असल्याचा आरोप करत गद्दारांना नेमकी कुणाची भीती आहे, हे देशासमोर आले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
देशातील तरुणाईच्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी सरकारवरही जोरदार निशाणा साधला. तरुण न्याय आणि हक्कासाठी रस्त्यावर उतरले असताना त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही; मात्र फुटीर खासदारांना भेटण्यासाठी वेळ आहे, अशी टीका त्यांनी केली. तरुणांवर अत्याचार करून, त्यांना देशद्रोही ठरवून आणि ट्रोल करून प्रश्न सुटणार नाहीत. केवळ एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन भागणार नसून संपूर्ण व्यवस्था बदलण्याची गरज आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
देशात सध्या ‘मतलबी वारे’ सुरू असून ही वादळापूर्वीची शांतता आहे, असा इशाराही त्यांनी दिला. विरोधक सत्ताधाऱ्यांकडे गेले की विरोध शांत होईल, असे सत्ताधाऱ्यांना वाटत असेल; मात्र आम्ही थंड बसणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जनतेने पुढे यावे, असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी सरकार बदलण्याची वेळ आता आली असल्याचेही ठामपणे सांगितले.