उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गहिवरल्या
(अनंत नलावडे)
मुंबई: तब्बल २ लाख १८ हजार मतांच्या मताधिक्याने बारामती पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मतदारांनी दाखवलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अक्षरशः गहिवरून आले.त्यामुळेच सोमवारी सकाळी त्यांनी आपल्या “एक्स”यावर एक ट्विट करत,”बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे, अशा शब्दांत बारामतीकरांचे खास आभार मानले.
अजितदादांच्या पश्चात झालेली बारामतीची ही पहिलीच निवडणूक होती.त्यांच्या मार्गदर्शनाची आणि त्यांच्या उपस्थितीची उणीव आज प्रकर्षाने जाणवते; हा विजय माझ्यासाठी केवळ राजकीय यश नसून, दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी केलेले कार्य, त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि विकासाची त्यांची दृष्टी आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांचे विचार आणि संस्कारच मला पुढे जाण्याची ताकद देत आहेत. हा विजय म्हणजे त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे, याची पूर्ण जाणीव असल्याचेही सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे.यावेळी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभारही मानले आहेत.
तुमच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय शक्य झाला आहे. तसेच या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, पाठिंबा दिलेले इतर सर्व मित्र पक्ष, विविध संस्था, संघटना यांचेही सुनेत्रा अजित पवार यांनी आभार मानले.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा निर्धार कायम राहील.तरुणाई, शेतकरी, महिला, उद्योजक आणि समाजातील सर्वच घटकांना केंद्रस्थानी ठेवून बारामतीच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले.
निवडणुका येतात आणि जातात,पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे.म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया.बारामतीकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही असा विश्वास व्यक्त करतानाच, आपल्या सर्वांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभी राहीन, अशी खात्रीही सुनेत्रा पवार यांनी दिली. त्याचवेळी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, बारामतीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहिन असा शब्दही त्यांनी दिला.