– पहिल्या दिवसअखेर भारतीय संघ ३६८/३- कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुलची शतकी खेळी-ऋषभ पंत आणि साई सुदर्शनचे अर्धशतक
न्यू चंदीगड : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने धावांचा पाऊस पाडला. न्यू चंदीगड येथे झालेल्या या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी शतके झळकावली, तर साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी अर्धशतके केली. यामुळे भारताला पहिल्या दिवशी तीन गडी गमावून ३६८ धावांपर्यंत मजल मारण्यास मदत झाली. शुभमन १०३ धावांवर नाबाद राहिला, तर राहुलने १००, सुदर्शनने ८१ आणि पंतने ५० धावा नाबाद केल्या. मोहम्मद सलीमने अफगाणिस्तानसाठी दोन बळी घेतले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मानव सुथारने कसोटी पदार्पण केले. यशस्वी जैस्वाल आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. जैस्वालने जलद धावा करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि याच प्रयत्नात, पाच चौकारांसह २४ धावा करून तो मोहम्मद सलीमच्या गोलंदाजीवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शन आणि राहुलने दुसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. आयपीएलमधील आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत सुदर्शनने अर्धशतक झळकावले. त्याने ६७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, पण ८१ धावांवऱ बाद झाला. तो बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या दोन गडी बाद १८० होती.
राहुलने ८६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर १६४ चेंडूंमध्ये आपले १२ वे कसोटी शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत ११ चौकारांचा समावेश होता. शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच झियाउर रहमानने त्याचा झेल घेतला. पण, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारताची बाजू भक्कम ठेवली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ११५ धावांची भागीदारी करून भारतीय संघाला ४०० धावांच्या जवळ पोहोचवले. कर्णधार शुभमननेही १३८ चेंडूंमध्ये आपले ११ वे कसोटी शतक पूर्ण केले. २०२५ पासून कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे पाचवे शतक होते.