तेहरान : इराणविरोधातील संभाव्य लष्करी हल्ले स्थगित करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर इराणी माध्यमांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली असून त्यांची खिल्लीही उडवली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी ट्रम्प यांच्या कोणत्याही दाव्याची पुष्टी केलेली नाही. उलट, त्यांनी या घडामोडीचे वर्णन वॉशिंग्टनच्या माघारीप्रमाणे केले आहे. अर्ध-सरकारी वृत्तसंस्थाने लिहिले, “मूर्ख ट्रम्प यांचा दम संपला आहे.” तर दुसऱ्या एका अर्ध-सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले की, “ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या पोकळ धमक्यांमधून मागे हटले असून आपल्या माघारीला उपकारासारखे सादर करत आहेत.”
लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने असेही म्हटले की, इराणी सैन्य उच्च सतर्कतेवर असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यालाही इराणने फेटाळून लावले आहे. इराणी वाटाघाटीकारांच्या निकटवर्तीय सूत्राच्या हवाल्याने म्हटले की, “जोपर्यंत अमेरिका आपली शत्रुत्वपूर्ण कारवाई सुरू ठेवेल, तोपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहील.”
इराणी माध्यमांनी पाश्चात्त्य वृत्तांचाही उल्लेख केला आहे. या वृत्तांनुसार, अमेरिकेच्या हवाई संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा साठा कमी झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दावा केला की, ट्रम्प यांनी हल्ला स्थगित करण्यामागील हे एक प्रमुख कारण आहे.ही वक्तव्ये २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या पाच महिन्यांच्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहेत. त्यावेळी अमेरिका आणि इस्रायल यांनी तेहरानवर हल्ले सुरू केले होते.यापूर्वी झालेला युद्धविराम भंगल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील आपली पकड अधिक मजबूत केली होती.
तेहरानच्या विरोधानंतरही ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या युवराजांशी चर्चा केल्यानंतर सांगितले की, अमेरिकन सैन्य इराणविरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा असा दावा केला की इराणनेच हल्ला टाळण्याची विनंती केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया मंच ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत सांगितले की, हा निर्णय प्रादेशिक देशांच्या विनंतीनंतर घेण्यात आला आहे. त्यांनी लिहिले, “इराण आणि इतर मध्यपूर्वेतील देशांनी आम्हाला कोणताही हल्ला करू नये, अशी विनंती केली आहे, कारण कराराच्या अटींवर सहमती झाली आहे.” तसेच त्यांनी दावा केला की, या करारामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे खुली करण्याचाही समावेश आहे.