अटकेचा प्रयत्न झाल्यास इस्रायली विशेष दल हस्तक्षेप करणार- बेंजामिन नेतन्याहू

0

वॉशिंग्टन : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने (आयसीसी) जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे एखाद्या परदेशी सरकारने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास इस्रायलचे विशेष दल (स्पेशल फोर्सेस) हस्तक्षेप करेल. अमेरिका दौऱ्यादरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नेतन्याहू यांना परदेशात अटक होण्याची भीती वाटते का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिले, “होय, मी याबाबत विचार करतो. आमच्याकडे विशेष दल आहेत. मी स्वतः पाच वर्षे सैन्यात सेवा बजावली आहे.” तसेच, आयसीसी च्या २०२४ मधील आदेशाला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये जाण्यासही आपल्याला कोणतीही भीती किंवा संकोच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेतन्याहू यांनी न्यूयॉर्क शहराला भेट देणार असल्याची पुष्टी केली. त्यांनी न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या मागण्यांनाही फेटाळून लावले. ममदानी यांनी फेडरल अधिकाऱ्यांकडे नेतन्याहू यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करत त्यांना “युद्धगुन्हेगार” असे संबोधले होते.यावर प्रत्युत्तर देताना नेतन्याहू म्हणाले, “ते द्वेष पसरवणारे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. ते न्यूयॉर्कमधील ज्यू समुदायाविरोधात लोकांना भडकवत आहेत.”

दरम्यान, ममदानी यांनी म्हटले की, गाझामधील इस्रायलच्या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त होत असलेल्या चिंतेचे प्रतिबिंब आयसीसी च्या आदेशात दिसते. मात्र, स्थानिक महापालिका प्रशासनाकडे अशा अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे अधिकार नसतात.दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना अमेरिकेत अटक होण्याचा कोणताही धोका नसल्याचे आश्वासन दिले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये आयसीसी ने गाझामधील इस्रायली लष्करी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्यांच्यावर युद्धाचे साधन म्हणून उपासमार घडवून आणणे, सामान्य नागरिकांना लक्ष्य करणे, हत्या आणि अमानुष वर्तन अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे. नेतन्याहू यांनी हे सर्व आरोप वारंवार फेटाळून लावत त्यांना राजकीय हेतूने प्रेरित आणि ज्यूविरोधी असल्याचे म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech