वॉशिंग्टन : पश्चिम आशियातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, गाझामधील सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी एक मोठा करार झाला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील ‘बोर्ड ऑफ पीस’ने गाझामधील हमास आणि इतर सर्व सशस्त्र गटांच्या संपूर्ण नि:शस्त्रीकरणाबाबत सहमती साधली आहे. ट्रम्प यांनी याला शांततेच्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल असे संबोधले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर या कराराची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा करार एकाच वेळी लागू होणार नसून टप्प्याटप्प्याने राबवला जाईल. ट्रम्प यांच्या मते, गाझामध्ये जसे-जसे नि:शस्त्रीकरण पूर्ण होत जाईल, तसे-तसे इस्रायली सैन्य माघार घेत जाईल. त्यानंतर ‘इंटरनॅशनल स्टॅबिलायझेशन फोर्स’ (आयएसएफ) तेथील सुरक्षा आणि प्रशासनाची जबाबदारी स्वीकारेल. ही फोर्स नव्या पॅलेस्टिनी पोलिस दलासोबत समन्वय साधून गाझामध्ये शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करेल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे २०० ते ३०० दिवस लागू शकतात.
या करारातील प्रमुख मुद्दे: हमास आणि इतर सर्व सशस्त्र गट आपली शस्त्रे जमा करतील तसेच भूमिगत बोगदे नष्ट करतील. नि:शस्त्रीकरण पूर्ण होताच इस्रायली सैन्य गाझामधून बाहेर पडेल. आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल (आयएसएफ) आणि नव्याने स्थापन करण्यात येणारे पॅलेस्टिनी पोलिस दल गाझाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळतील. गाझाचे शासन एका नव्या नागरी सरकारकडे सोपवले जाईल, जे ‘बोर्ड ऑफ पीस’च्या सहकार्याने काम करेल. इजिप्त, कतार आणि तुर्की यांच्या मध्यस्थीमुळे हा करार शक्य झाला आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, हा करार त्यांच्या २० सूत्रीय गाझा शांतता योजनेचा एक भाग आहे. या संपूर्ण योजनेवर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील ‘बोर्ड ऑफ पीस’ देखरेख करत आहे. या करारानुसार गाझामधील हमासचे शासन पूर्णपणे समाप्त होईल आणि तेथील प्रशासनासाठी नवीन पॅलेस्टिनी सरकारची स्थापना केली जाईल. यापूर्वी, ६ जुलै रोजी हमासने गाझातील आपले सरकार बरखास्त करण्याची घोषणा केली होती.
ट्रम्प यांनी इजिप्त, कतार आणि तुर्की या देशांचे विशेष आभार मानले. या तीन देशांनी कैरो येथे हमासच्या नेत्यांसोबत दीर्घ चर्चा करून हा करार घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, “एक वर्षापूर्वी या भागात भीषण युद्ध सुरू होते. मानवी संकट गंभीर होते आणि अनेक लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. आता आम्ही ऐतिहासिक प्रगती साधली आहे; मात्र शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अजूनही बरेच काम बाकी आहे.”