देशात उष्णतेची लाट; नागरिकांनी काळजी घ्यावी – पंतप्रधान

0

नवी दिल्ली : देशभरात वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुरेसे पाणी पिणे, बाहेर जाताना पाणी सोबत ठेवणे आणि उष्माघातापासून बचावासाठी सतर्क राहणे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर केलेल्या संदेशात म्हटले आहे की, देशातील अनेक राज्ये सध्या तीव्र उष्णतेच्या तडाख्यात आहेत. अशा परिस्थितीत लहान मुले, वृद्ध आणि बाहेर काम करणारे नागरिक अधिक असुरक्षित असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उष्माघाताची लक्षणे दुर्लक्षित करू नयेत, कारण ते धोकादायक ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी गरजू व्यक्तींना पाणी देऊन मदत करावी तसेच घराबाहेर पाण्याच्या घागरी ठेवून पक्षी व प्राण्यांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मोदी म्हणाले की, “देशाच्या विविध भागांमध्ये तापमान सतत वाढत आहे. या काळात परस्पर संवेदनशीलता आणि करुणा दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” दरम्यान, २५  मेपासून सुरू झालेल्या नौतपा कालावधीमुळे अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव वाढला असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक कठीण झाले आहे. सकाळपासूनच कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech