वाढते दर आणि आयात शुल्काचा परिणाम; सोन्याची मागणी नीचांकी पातळीवर जाण्याचा अंदाज
नवी दिल्ली : सोन्याच्या आकर्षणाच्या बाबतीत भारताला नेहमीच जगातील आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळाले आहे. विशेषतः सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीत भारताचा जगातील पहिल्या तीन देशांमध्ये समावेश होतो. मात्र, सोन्याचे गगनाला भिडलेले दर आणि त्यावर आकारण्यात येणारे भरमसाट कर यामुळे भारतीय ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील सोन्याच्या मागणीवर झाला असून, त्यात वार्षिक आधारावर तब्बल २९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत भारतातील सोन्याची एकूण मागणी घसरून १६२.५ टनांवर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी २२९.८ टन होती. विशेष म्हणजे, वजनाच्या आधारावर मागणीत मोठी घट झाली असली, तरी सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे मूल्याच्या आधारावर खरेदीत तीन टक्क्यांची वाढ होऊन ती २.४१ लाख कोटी रुपयांच्या पुढे पोहोचली आहे.सोन्याच्या मागणीतील या घसरणीमागे मौल्यवान धातूचे वाढलेले दर, आयात शुल्काचा भार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत गरज असेल तेव्हाच सोने खरेदी करण्याचे केलेले आवाहन ही प्रमुख कारणे मानली जात आहेत.
दागिन्यांच्या मागणीतही मोठी घट
भारतीय बाजारपेठेत पारंपरिकदृष्ट्या सर्वाधिक मागणी असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीतही मोठी घट झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत दागिन्यांची मागणी वार्षिक आधारावर २० टक्क्यांनी घसरून ९९.९ टनांवर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी १२५ टन होती.वर्ल्ड गोल्ड कौन्सिल इंडियाच्या मते, सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहक आता वजनदार दागिन्यांऐवजी कमी वजनाचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच नवीन दागिने खरेदी करण्याऐवजी जुने दागिने बदलून नवीन दागिने घेण्याचा पर्यायही ग्राहकांकडून निवडला जात आहे.