मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार राज्यातील १६ वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि राज्य पोलीस सेवा (आरपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. गृह विभागाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनुसार या बदल्या आणि नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, परिमंडळ क्रमांक पाचचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि कोकण परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिवराज पाटील यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हे तिन्ही अधिकारी आणखी एक वर्ष आपापल्या पदावर कार्यरत राहणार आहेत.
दरम्यान, ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ठाणे शहराच्या परिमंडळ क्रमांक एकच्या पोलीस उपायुक्त मीना मखवाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जयंत बजबळे यांची ठाणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या फेरबदलांमुळे ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत. राज्यातील इतर बदल्यांमध्ये आकांक्षा यादव यांची रत्नागिरी येथून लातूर जिल्ह्यातील औसा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वैशाली ईश्वर कडुकर यांची सातारा येथून पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. चेतना तिडके यांची अंबाजोगाई येथून नागपूर अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सूरज गुरव यांची ठाणे शहरातून नांदेड येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. नरसिंग यादव यांच्याकडे सातारा येथील अपर पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय धनंजय अनंत जाधव यांची पिंपरी-चिंचवड येथून सातारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विकास संपत नाईक यांची नागपूर येथून मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागात बदली झाली आहे. संकेत सतीश गोसावी यांची पुणे येथून रत्नागिरी येथे, तर कुमार भिकाजी चौधरी यांची लातूर येथून नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर पुंडलिक नांदणवार यांची भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे, तर संतोष वैरागडे यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत चंद्रकांत कांकाळ यांचीही छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. तर संदीप जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, नांदेड प्रतीक्षाधीन आहे. एकीकडे राज्यभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले असताना ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांना देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढ विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. या निर्णयामुळे ठाणे पोलीस दलातील महत्त्वाच्या पदांवरील अनुभव कायम ठेवण्याचा गृह विभागाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.