चिनी अब्जाधीशाला मागे टाकत मुकेश अंबानी बनले पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

0

जागतिक श्रीमंतांच्या यादीत अद्याप पहिल्या २० जणांमध्ये स्थान नाही

नवी दिल्ली : मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या ताज्या रिअल-टाइम अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी टिकटॉकची मूळ कंपनी असलेल्या बाइटडान्सचे सहसंस्थापक झांग यिमिंग यांना मागे टाकत हा मान मिळवला आहे. आज मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत साडेदहा टक्क्यांची मोठी वाढ झाली. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती वाढून ८८.८ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ७.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या मोठ्या वाढीसह अंबानी आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत २२ व्या स्थानावर पोहोचले आहेत.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत झालेल्या या विक्रमी वाढीचे प्रमुख कारण म्हणजे सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये झालेली १२ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात समभागांची खरेदी केली. त्यामुळे रिलायन्सच्या बाजारमूल्यात एकाच दिवसात सुमारे १.६ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल २८ टक्क्यांनी वाढून ३.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला, तर निव्वळ नफ्यात ३४ टक्क्यांची मोठी वाढ होऊन तो विक्रमी २९ हजार ५५० कोटी रुपयांवर पोहोचला. याशिवाय, अलीकडेच राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात जिओ प्लॅटफॉर्म्सच्या देशातील सर्वात मोठ्या प्रारंभिक समभाग विक्रीची २७ टक्के प्रीमियमसह झालेली दमदार नोंदणी यामुळेही कंपनीच्या मूल्यांकनाला मोठी चालना मिळाली आहे.

या घडामोडीनंतर झांग यिमिंग यांची ८४ अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत घसरण होऊन ते २५ व्या स्थानावर पोहोचले आहेत. तर भारतातील दुसरे मोठे उद्योगपती आणि अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी हे ८०.१ अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत २६ व्या स्थानावर कायम आहेत. रिलायन्सच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे बाजारातील तज्ज्ञही उत्साहित झाले आहेत. त्यामुळे २०१७ नंतर प्रथमच रिलायन्सच्या समभागाबाबत कोणत्याही मोठ्या विश्लेषकाने ‘होल्ड’ किंवा ‘सेल’ असे मानांकन दिलेले नाही. सध्या सर्व प्रमुख विश्लेषक रिलायन्सच्या समभागासाठी ‘बाय’ अर्थात खरेदी करण्याचे मानांकन देत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech