अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका; सुनील तटकरेंच्या चौकशीची महेंद्र थोरवेंची मागणी

0

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेवरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विलीनीकरणाच्या चर्चेच्या वेळी पवार कुटुंबीय आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय नेते एकत्र बसून चर्चा करीत होते. मात्र, या प्रक्रियेत सुनील तटकरे यांना सहभागी करून घेण्यात आले नव्हते, असा दावा थोरवे यांनी केला. आता अजित पवार यांनी विलीनीकरणाबाबत आपल्याशी चर्चा केली होती, असे तटकरे सांगत असतील तर तो दावा खोटा असल्याचेही त्यांनी म्हटले.

अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे यांनी एका हॉटेलमधून आमदारांशी संपर्क साधून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही थोरवे यांनी केला. प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून पक्षाची सूत्रे, उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखाते स्वतःकडे घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात होता का, याबाबत काहींकडून शंका उपस्थित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरेंची चौकशी झाली पाहिजे, असे मत थोरवे यांनी व्यक्त केले. आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांशीही आपण सहमत असल्याचे त्यांनी सांगितले. थोरवे यांच्या या वक्तव्यामुळे रायगडसह राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यांनी केलेले आरोप अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech