पुणे : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना पुन्हा वेग आला आहे. ‘वेळ येईल तशा गोष्टी तुम्हाला समजतील,’ असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, याबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर या राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
बुधवारी बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी केवळ ‘वेळ येईल तशा गोष्टी समजतील,’ असे उत्तर दिले. त्यांच्या या मोजक्या विधानामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषद घेतली होती. पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी या उपक्रमांची माहिती दिली. पत्रकार परिषदेनंतर माध्यमांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाल्यास त्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल, कोणता पक्ष कोणामध्ये विलीन होणार, नव्या पक्षाचे नेतृत्व कोण करणार, तसेच शरद पवार भाजपसोबत जाणार का, असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. आमदार रोहित पवार यांनी भाजपची साथ सोडल्यास विलिनीकरणाबाबत चर्चा होऊ शकते, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यामुळे या प्रक्रियेतील राजकीय पेच अधिकच वाढला आहे. आता सुनेत्रा पवार यांच्या सूचक विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत उत्सुकता आणखी वाढली असून आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.