नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी बुधवारी सांगितले की, फारसच्या आखातातून दुबईच्या दिशेने जाणाऱ्या लायबेरियाचा ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर अज्ञात वस्तूने (प्रोजेक्टाइल) हल्ला केला. या हल्ल्यात जहाजावरील चार कर्मचारी जखमी झाले असून, त्यामध्ये एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे.ही घटना मंगळवारी घडली. ‘एमटी फुजैराह एनर्जी’ नावाचे अतिमोठे कच्च्या तेलाची वाहतूक करणारे जहाज (व्हीएलसीसी) अल रुवैस येथून दुबईच्या दिशेने जात असताना त्यावर हल्ला करण्यात आला. केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, या हल्ल्यात जहाजावरील चार कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी एका भारतीय नागरिकाला किरकोळ दुखापत झाली असून, पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्याला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. जहाजावरील उर्वरित १८ कर्मचारी सुरक्षित असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. यामध्ये जहाजावर कार्यरत असलेल्या अन्य पाच भारतीय खलाशांचाही समावेश आहे. सोनोवाल यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासोबतच त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि इतर मदत उपलब्ध करून देण्यासाठी सरकार जहाज व्यवस्थापन कंपनीच्या सतत संपर्कात आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या ताज्या हल्ल्यामुळे फारसचे आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांच्या तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात भारतीय खलाशी असलेल्या आणखी एका जहाजावर हल्ला करण्यात आला होता. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पनामाचा ध्वज असलेल्या ‘एमटी लुईस १’ या तेलवाहू जहाजावर लिंपेट माइनच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला होता.या स्फोटामुळे जहाजाला आग लागली होती. या जहाजावर २७ भारतीय खलाशी होते. ओमानमधील खसब शहराच्या ईशान्येला सुमारे २५ नॉटिकल मैल (४६ किलोमीटर) अंतरावर ही घटना घडली होती. त्यानंतर केंद्र सरकारने जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची पुष्टी केली होती.