श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील आखरन-नौपुरा येथे बुधवारी गस्त घालत असलेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममधील आखरन-नौपुरा येथे बुधवारी दुपारी सीआरपीएफच्या ४६व्या बटालियनच्या जवानांनी नाकाबंदी केली होती. या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनांची आणि नागरिकांची तपासणी सुरू होती.दुपारी सुमारे २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास दुचाकीवरून आलेले दोन तरुण नाक्याजवळ पोहोचले. त्यांनी अचानक सीआरपीएफच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. या गोळीबारात सीआरपीएफचे तीन जवान जखमी होऊन जमिनीवर कोसळले.
हल्ल्यानंतर इतर जवानांनी तातडीने मोर्चा सांभाळत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, परिसरात झालेली गोंधळाची परिस्थिती आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून जवानांनी काही प्रमाणात संयम बाळगला. याचाच फायदा घेत दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.हल्ल्याची माहिती मिळताच जवळच्या सुरक्षा छावण्यांमधून अतिरिक्त जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. तसेच जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या हल्ल्यात कॉन्स्टेबल (जीडी) राकेश दास, वडील अरुण दास, रहिवासी आसाम, कॉन्स्टेबल (जीडी) संतोष चंद्रू, वडील महावीर, रहिवासी पश्चिम बंगाल, हेड कॉन्स्टेबल (जीडी) सोमवीर सिंह, वडील महावीर, रहिवासी मध्य प्रदेश अशी जखमी झालेल्या जवानांची नावे आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, एका जवानाच्या पायाला, दुसऱ्या जवानाच्या हाताला, तर तिसऱ्या जवानाच्या पाठीला गोळी लागली आहे. जवान संतोष चंद्रू यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, सुरक्षा दलांनी घटनास्थळाच्या आसपासच्या सर्व भागांत शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरणही तपासले जात आहे. या घटनेनंतर सीआरपीएफ, पोलीस आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.