पाकिस्तानने लाहोरच्या खराब हवेसाठी भारताला धरले जबाबदार

0

नवी दिल्ली : भारतात, विशेषतः उत्तर भारतातील राज्यांमध्ये दिवाळीनंतर वायुप्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. यावरून पाकिस्तानने भारतातून येणारे प्रदूषणच तेथील खराब हवेचे प्रमुख कारण असल्याचा दावा केला आहे.दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरसह भारतातील अनेक भागांमध्ये धुरक्याची हलकी चादर पसरल्याचे दिसत आहे. विशेषतः दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानमधील प्रसिद्ध शहर लाहोरने स्विस संस्था ‘आयक्यूएअर’च्या जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पहिला क्रमांक कायम राखला.लाहोरचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २६३ इतका नोंदवण्यात आला. या पातळीवरील हवा आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि अस्वास्थ्यकर मानली जाते.

‘आयक्यूएअर’च्या आकडेवारीनुसार, शहरातील पीएम २.५ या सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वार्षिक मार्गदर्शक मर्यादेपेक्षा ३७.२ पट अधिक होते. पीएम २.५ हे हवेतील अतिसूक्ष्म आणि हानिकारक कण असतात. त्यांचा आकार इतका लहान असतो की, ते फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊ शकतात. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पर्यावरण संरक्षण मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, दिवाळीनंतर भारताच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे या भागात प्रदूषक घटक पोहोचले आहेत. मात्र, दुपारनंतर वायुप्रदूषणाची पातळी हळूहळू कमी होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हवामानात सुधारणा होईल आणि वाऱ्यांची दिशाही बदलू शकते,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, पाकिस्तानच्या या दाव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दुसरीकडे, दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक १८८ नोंदवण्यात आला असून, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित प्रमुख शहर म्हणून दिल्लीची नोंद झाली आहे. मंगळवारी ‘आयक्यूएअर’ने ही आकडेवारी जाहीर केली. तसेच, भारतीय यंत्रणांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, त्याच्या आदल्या दिवशी दिल्लीतील पीएम २.५ प्रदूषणाच्या पातळीत फटाक्यांमुळे सुमारे ५५ टक्के भर पडली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech