मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर मिळावे, यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून दरवर्षी घरांची सोडत काढली जाते. मात्र, मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील म्हाडाच्या घरांबाबत गंभीर घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या परिसरातील अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या ११० सदनिकांवर बांगलादेशी घुसखोरांनी ताबा मिळवल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ११० सदनिकांसाठी मूळ अर्ज हिंदू नागरिकांच्या नावाने करण्यात आले होते. मात्र, सदनिकांचे मुखत्यारपत्रधारक आणि प्रत्यक्ष लाभार्थी हे बांगलादेशी मुस्लिम घुसखोर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचे पुरावे म्हाडा प्रशासन आणि संबंधित मंत्र्यांकडे सादर करून सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात काही सदनिकाधारकांची मूळ नावे आणि सध्या त्या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची नावेही सोमय्या यांनी उघड केली आहेत.
दरम्यान, नूरबाजार परिसरातील म्हाडाच्या अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ५० हून अधिक रहिवाशांनी मुलुंड पूर्व येथील नीलम नगरमधील सोमय्या यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी रहिवाशांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. परिसरात अतिक्रमण, घुसखोरी, बेकायदेशीर व्यवहार, गुंडगिरी आणि बनावट मालकी व्यवहारांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्यांची माहिती घेतल्यानंतर सोमय्या यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोईर यांना पत्र लिहून तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. म्हाडामधील काही भ्रष्ट अधिकारी, एजंट आणि घुसखोर यांच्या संगनमतातून सर्वसामान्यांसाठी उभारलेल्या सरकारी गृहनिर्माण योजनेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी पत्रातून केला आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.