गरज पडली तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी – गिरीश महाजन

0

‘जलदूत’वरून लातूरमध्ये पुन्हा राजकीय रणकंदन; अमित देशमुखांचा ‘षडयंत्र’चा आरोप

लातूर | प्रतिनिधी

“यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत, गरज पडल्यास लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो,” असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर देताना महाजन म्हणाले की, २०१६ मध्ये लोक तहानलेले असताना पाणी देणे हे षडयंत्र कसे असू शकते? इतक्या वर्षांनंतर असे बोलणे योग्य नाही, अशी भूमिका महाजन यांनी मांडली.

२०१६ च्या भीषण दुष्काळात मिरजहून ‘जलदूत’ रेल्वेने लातूरला पाणी आणण्याचा निर्णय हा निव्वळ मदत नव्हती, तर राजकीय षडयंत्राचा भाग होता, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी केला होता. लातूर शहरातील विक्रमनगर परिसरातील ‘डिस्कव्हरी ॲक्वा’ प्लांटच्या शुभारंभप्रसंगी परवा रात्री झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी बीड, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांतही दुष्काळ होता, तरीही केवळ लातूरचीच रेल्वेने पाणी आणण्यासाठी निवड का केली गेली, असा सवाल त्यांनी केला. “विलासराव देशमुख हे लातूरचे मुख्यमंत्री असूनही त्यांना स्वतःच्या शहरासाठी पाणी आणता आले नाही, अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी विरोधकांनी या संकटाचा जाणीवपूर्वक वापर केला. हा अपप्रचारच होता,” असा दावा देशमुख यांनी केला.

दुष्काळग्रस्त लातूरला आता रेल्वेने पाणी आणणार का?

आता लातूरचे सर्व दहा तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले असूनही सरकार रेल्वेने पाणी आणणार नाही, कारण तसे केल्यास इतकी वर्षे सत्तेत असून काय केले, असा प्रश्न उपस्थित होईल, असा खोचक टोलाही अमित देशमुख लगावला. त्याचबरोबर त्यांनी लातूरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे सर्वंकष लेखापरीक्षण, धरणापासून घरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर फ्लो मीटर बसवणे, गळती रोखणे, पिवळे-गढूळ पाणी येण्याच्या तक्रारी दूर करणे आणि सिंगापूरच्या ‘न्यू वॉटर’ योजनेच्या धर्तीवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करण्याचे दीर्घकालीन नियोजन करण्याची मागणी केली.

लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवून दाखवा

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनीही देशमुखांवर पलटवार करत, “काँग्रेस इतकी वर्षे सत्तेत असताना, लातूर महापालिकेतही काँग्रेसचेच वर्चस्व असताना आणि स्वतः अमित देशमुख अनेक वर्षांपासून लातूरचे नेतृत्व करत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही? आजही लातूरमध्ये जवळपास महिन्याभराने पाणी येते,” असा सवाल केला आणि आगामी पंचवार्षिक योजनेत लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवून दाखवण्याचे आव्हान दिले.

मराठवाड्यातील पाच जिल्हे सध्या डेंजर झोनमध्ये

दरम्यान, २०१६ ची पार्श्वभूमी अशी होती की, मांजरा धरण कोरडे पडल्याने फेब्रुवारीतच नळाद्वारे पाणीपुरवठा थांबला होता, २०१५ मध्ये पाऊस सरासरीच्या केवळ ४९% झाला होता आणि ११ एप्रिल २०१६ रोजी पहिली पाणीवाहू रेल्वे लातूरकडे रवाना झाली होती. यंदाही मराठवाड्यातील आठपैकी पाच जिल्हे सध्या डेंजर झोनमध्ये असून ४,७३९ गावांतील ९,१२२ योजनांसाठी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा टंचाई आराखडा तयार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा जुना वाद पुन्हा पेटला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech