“विलीनीकरणावर चर्चा नाही, फक्त अधिवेशन आणि मालिकांवर बोललो,” नेत्यांचा दावा
पुणे/ओतूर | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे शनिवारी पार पडलेल्या राज्यव्यापी सत्यशोधक समाज अधिवेशनापूर्वी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात माळशेज घाटातील एका रिसॉर्टमध्ये गोपनीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली असल्याचे सांगितले जात असतानाच ही भेट झाल्याने तिला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर बोलणे झाले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. अधिवेशनासाठी येत असताना भुजबळ यांच्या ताफ्यातील वाहनांचा किरकोळ अपघातही झाला, मात्र सर्वजण सुखरूप असल्याने त्यांनी दौरा सुरूच ठेवला. अधिवेशनाला मंत्री भुजबळ, खासदार कोल्हे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मंचावर आले, तर उद्घाटनासाठी येणार असलेले शरद पवार हे डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्दीत न जाण्याच्या कारणामुळे अनुपस्थित राहिले.
अधिवेशनानंतर दोन्ही नेत्यांनीच माध्यमांसमोर खुलासा करत गुप्त भेटीतील राजकीय चर्चेच्या अटकळींना विराम देण्याचा प्रयत्न केला. “अमोल कोल्हेही या कार्यक्रमासाठी आले होते, त्यांच्याशी माझे बोलणे झाले. मात्र आजच्या कार्यक्रमाबाबतच चर्चा झाली, तसेच त्यांच्या मालिकांबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या तरी विलीनीकरण होईल, असे वाटत नाही,” असे भुजबळ म्हणाले. तर कोल्हे यांनीही “आमच्याकडे विलीनीकरणाबाबत कोणत्याही चर्चा सुरू नाहीत. अजित पवार होते तेव्हा चर्चा झाली नाही, असे म्हणणारे आता अचानक चर्चा झाल्याचे सांगत आहेत – हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. खरोखरच गोपनीय चर्चा झाली असती, तर ती जाहीरपणे थोडीच सांगायची असते,” असे सूचक विधान केले.
रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याचा इन्कार
रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेवरही कोल्हे यांनी “रोहित पवार यांनी माध्यमांना असे सांगितले आहे का? ते राज्यात धडाडीने विरोधकांची भूमिका मांडत आहेत, त्यांच्यावर असा टॅग लावू नये,” असे म्हणत दावा फेटाळला. सुप्रिया सुळे यांनी याआधीच “ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपला,” असे म्हटले असल्याने दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी धूसर असल्याचे चित्र आहे.